
रस्ते, वीज आणि पुलासारख्या पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी दिवाळीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शिदोरी आंदोलन’ करणाऱ्या मेळघाटातील आदिवासींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत संबंधित यंत्रणा प्रमुखांना तातडीन
.
मेळघाटातील खुटीया, एकताई, सिमोरी आणि हातरू या गावांमध्ये रस्ते, वीज आणि पुलांच्या समस्या आहेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासींनी दिवाळीच्या एक दिवस आधी आंदोलन केले होते. त्यावेळी सर्व विभागप्रमुखांना एकत्र करून तोडगा काढणे शक्य नसल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी ४ नोव्हेंबर रोजी विस्तृत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
त्यानुसार, मंगळवारी सर्व संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीदरम्यान ‘खोज’ संस्थेचे प्रमुख ॲड. बंड्या साने, दशरथ बावनकर आणि संबंधित आदिवासींच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, विशेषतः या भागातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी येरेकर यांनी सांगितले की, पुलांच्या कामांसाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यामुळे पुलांच्या बांधकामासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात येणार असून, ही कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी जरिदा उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागला असून, येत्या काळात २२ गावातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. विजेच्या समस्येमुळे मोबाईल नेटवर्क राहत नसल्याने, विजेची सोय असलेल्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी सूचना देण्यात येतील.
आदिवासी क्षेत्रातील मक्याची खरेदी आदिवासी विभागाकडून सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. नागरिकांच्या रस्ते, वीज आणि पुलाच्या मागण्या पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही येरेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., किर्ती जमदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.
कुटीदा ते सिमोरी आणि सोमिथा ते कुटीदा या रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक तातडीने तयार करण्यात येईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



