
Election Postponed : मतदानाला अवघे काही तास राहिले असताना निवडणूक आयोगाने 22 नगरपालिकांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. न्यायालयीन प्रक्रियेचं कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ऐन शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांसह सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. पाहूयात नेमकं काय घडलंय
राज्यातील 22 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेचं कारण देत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात असताना अचानक निवडणूक लांबणीवर पडल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे.
निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं- मुख्यमंत्री
सुधारित वेळापत्रकानुसार आता 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होईल. दरम्यान निवडणूक आयोगाला ऐनवेळी झालेल्या साक्षात्कारावर सत्ताधा-यांसह विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचं म्हटलं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
निवडणूक आयोग चुकीचा पायंडा पाडत असल्याचा हल्लाबोल शिवसेना UBTने केला आहे. तर आयोगाचा निकाल धक्कादायक असून याबाबतचा विचार आधी व्हायला हवा होता असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.
कुठे कुठे निवडणुकांना स्थगिती?
बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा, वाशिम, अंबरनाथ, फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत, घुग्घूस, देवळी, देवळाली-प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी, उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा आणि अनगर यांना न्यायालयीन प्रक्रियेच कारण देत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात.
राज्यातील 22 नगरपरिषदा वगळता उर्वरित ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान होईल. तर पुढे ढकललेल्या निवडणुकांचा प्रचार आणखी लांबला आहे. निवडणुका कधी घ्यायच्या तसेच वेळप्रसंगी रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. हे जरी खरं असलं तरी सर्वच राजकीय पक्षांनी याला आक्षेप घेतल्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
FAQ
1) 22 नगरपालिकांच्या निवडणुका कोणत्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या?
न्यायालयीन प्रक्रियेचं कारण देत राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने तात्पुरत्या स्वरूपात निवडणुका स्थगित करण्यात आल्या.
2) निवडणुका किती काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या?
सुधारित वेळापत्रकानुसार या 22 नगरपालिकांच्या निवडणुका आता 20 डिसेंबर रोजी होणार आहेत. तर मतमोजणी 21 डिसेंबरला होईल.
3) निर्णय अचानक का घेण्यात आला?
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात न्यायालयातून काही निर्देश मिळाल्यानंतर आयोगाने परिस्थितीचा पुनर्विचार केला आणि तत्काळ स्थगिती जाहीर केली. त्यामुळे निर्णय अचानक घेतल्यासारखा वाटला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



