
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. प्रचारादरम्यान मित्रपक्षांनीच एकमेकांचे वाभाडे काढल्याने महायुतीत ‘कोल्ड वॉर’ सुरू झाल्या
.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका सभेत, “2 डिसेंबरपर्यंतच युती टिकवायची आहे,” असे सूचक विधान केले होते. त्यानंतर पुन्हा, “आमचा पक्ष एक नंबर असून दोन नंबरला काहीच किंमत नसते,” असे म्हणत त्यांनी मित्रपक्षांना डिवचले. याला प्रत्युत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपला थेट “बाटलेला पक्ष” संबोधल्याने वाद शिगेला पोहोचला. दुसरीकडे, कोकणात भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात घुसल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने दोन पक्षांतील संघर्ष रस्त्यावर आला आहे. यासर्व घडामोडींवरून निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले.
या सर्व राजकीय गोंधळाचा समाचार घेताना सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “प्रचारसभेतून अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना फोन लावून कामे सांगण्याची एकनाथ शिंदे यांची कृती ही त्यांची कार्यतत्परता नसून, ती त्यांची राजकीय ‘असुरक्षितता’ दर्शवणारी आहे. सत्तेत असूनही आपल्याच मित्रपक्षाकडून आपल्याला घेरले जात आहे, याची जाणीव शिंदेंना झाली असावी,” असे सुषमा अंधारे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांची पोस्ट जशीच्या तशी…
एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी जाहीर सभांमध्ये आपापल्या मंत्र्यांना फोन लावत आहेत आणि तिथून अमुक काम होईल का? तमुक कसा करता येईल या संबंधाने विचारणा करत आहेत..? हे बोलणे तसे हास्यास्पदच आहे. पण त्यांना असे का बोलावे लागत आहे याचा कधी आपण मानसशास्त्रीय विचार केलाय का?
नगरपरिषद निवडणुकीच्या विविध प्रचार सभांमधून अजित दादा सांगताहेत, तिजोरी माझ्याकडे आहे. शिंदेंचे आमदार सांगताहेत तिजोरी तुमच्याकडे असली तरी चाव्या आमच्याकडे आहेत. तर फडणवीस स्वतःच सांगत आहेत तिजोरी एकाकडे असली चाव्या दुसऱ्याकडे असल्या तरी तिजोरीतला माल आमचा आहे.
थोडक्यात काय आपण कसे अधिक शक्तिशाली आर्थिक दृष्ट्या सामर्थ्यवान हे सांगण्याचा आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण या प्रयत्नात शिंदेंनी अतिशयोक्तीची परिसीमा गाठली. शिंदेंच्या या वागण्याची सर्वत्र खिल्ली उडवली जात असली तरी शिंदे वारंवार पुन्हा पुन्हा प्रत्येक सभेत तीच कृती का करत आहेत. मानसशास्त्र सांगते माणूस आतून असुरक्षित असला की तो अधिक आक्रमक आणि हिंसक होतो.
शिंदे आतून असुरक्षित झाले आहेत का? होय, शिंदे असुरक्षित झाले आहेत किंबहुना शिंदेंची पाळेमुळे उखडून काढण्याचा जणू कुणी प्रयत्न करत आहे… याची आता शिंदेंना भनक लागली आहे.
संजय शिरसाटने केलेल्या भ्रष्टाचाराची आणि गैरमार्गाने जमवलेल्या मायेची चौकशी लागली आहे. संतोष बांगरने गद्दारी करण्यासाठी पन्नास कोटी घेतले हे भाजप आमदाराने जाहीर वृत्तवाहिन्यांवर स्पष्ट करून सांगितले. आपले सख्खे वडील भाजपाच्या केंद्रीय सत्तेमध्ये मंत्री आणि सख्खा भाऊ राज्य सरकारमध्ये मंत्री असताना सुद्धा निव्वळ शिंदेच्या पक्षात असल्यामुळे निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
इथे हे उल्लेखनीय आहे की, अमेडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी असणाऱ्या पार्थ पवार वर अजिबात गुन्हा दाखल झाला नाही…! मात्र ज्यांचे वडील आणि सख्खे बंधू भाजपच्या सत्तेतले मंत्री आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय..!! त्याचं कारण निव्वळ ते शिंदेंना साथ देत आहेत…!!!
काल सांगोल्याचे शहाजीबापू यांच्या घरी धाड पडली. रवींद्र चव्हाण हे जाहीर सभांमधून एक नंबर महत्त्वाचा असतो दोन नंबर काही कामाचा नाही हे उघडपणे सांगायला लागले. विशेष त्याला उलटून उत्तर देण्याची हिंमत उदय सामंत यांनी दाखवली नाही. मागच्या दोन-तीन महिन्यांपासून शिंदेंच्या मागे भाजपाने लावलेले हे शुक्लकाष्ट बघता “काय धाडी… काय चौकशी…काय गोंधळ… शिंदेंचा कार्यक्रम कसा ओके मध्ये लागला आहे.”
भाजपाकडून शिंदेंना जायबंदी करण्याचे अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत आतून कितीही भेदरून गेलेली अवस्था असली तरी सुद्धा, मी ताकदवान आहे. मी अत्यंत प्रभावशाली आहे. हे आपल्या साथीदारांना पटवून देणे शिंदेंची गरज आहे. अन्यथा एक फार मोठा गट भाजप कडे सहज जाऊ शकतो किंबहुना शिंदेंच्या सोबत असणाराच विश्वासू माणूस असे घडवून आणू शकतो…!
तेव्हा आपल्या साथीदारांना आणि मतदारांना सुद्धा मी आहे हे पटवून देण्यासाठी शिंदेंना अशी मोठमोठी विधाने करणे , आश्वासन देणे आणि भर सभेतून फोन लावणे हे प्रकार करावे लागत आहेत. मुळात हे सगळे प्रयत्न म्हणजे धास्तावलेल्या मनाचे लक्षण आहे..!
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



