
राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असून, अवघ्या काही तासात नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने काही ठिकाणी स्थगिती आणली असल्याने राजकीय पक्षांकडून नाराजी व्यक्त होत असताना, दुसरीकडे प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या म्हणजेच 2 डिसेंबरला मतदान होणार असतानाच, हिंगोलीत पोलिसांनी मोठा कारवाई केली आहे. एकीकडे निवडणूक आयोग निवडणूक सुरळीत व्हावी यासाठी तयारी करत असतानाच, पोलीस यंत्रणाही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सज्जा आहे. आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये आणि मतदारांना आमिष दाखवली जाऊ नयेत यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. यादरम्यान हिंगोलीत करोडोंची रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे.
हिंगोली शहरात 1 कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. सर्व रोकड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही रक्कम आणली असून तिचं मोजमाप सुरु आहे.
हिंगोली शहरांमध्ये शेतकरी भवन परिसरामध्ये हिंगोली पोलिसांच्या वतीने चार चाकी गाडीमध्ये एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या चार चाकी गाडीतील संपूर्ण रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
ही रोकड एका खासगी व्यापाऱ्याची असल्याची माहिती मिळत असून संबंधित व्यक्ती आमच्याकडे रोख रक्कम बाळगण्याबाबत परवानगी असल्याच सांगत आहे. मात्र निवडणूक विभागाच्या वतीने संबंधित रोकड पडताळणी आणि प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने ताब्यात घेतली आहे. ही संपूर्ण रोकडची मोजणी करण्याचं काम सुरू करण्यात येत आहे. या संपूर्ण रोकडची तपासणी व प्राथमिक चौकशी निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहे. तसंच कारमधील व्यक्तीकडून संबंधित व्यक्तींकडून संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
निवडणुका स्थगित झाल्याने नाराजी
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असतानाच निवडणूक आयोगाने काही ठिकाणी निवडणुकीवर स्थगिती आणली आहे. ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे, त्या प्रभागातील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. तसंच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात जिथे याचिका दाखल आहे, तिथे संपूर्ण नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. तिथे 20 डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे आणि 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. म्हणजेच ही निवडणूक दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे.
कुठे निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार?
पुणे जिल्ह्यातील बारामती, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, सोलापूरमधील मंगळवेढा, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



