
MLA Santosh Bangar: हिंगोली शहरातील मतदान केंद्रावर आमदार संतोष बांगरांच्या करामती पाहायला मिळाल्यात. संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर केला, एवढंच नव्हे तर थेट ईव्हीएमजवळ जाऊन घोषणाबाजीही केली. ते कमी की काय? संतोष बांगरांनी चक्क एका आजीला ईव्हीएमवर ते सांगतील ते बटन दाबायला लावलं.आपल्या बेलगाम वागण्यानं शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी चक्क लोकशाहीलाच नांगर लावल्याची चर्चा आता राज्यभर सुरु झालीये.
हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनजवळ उभं राहून घोषणाबाजी करताना दिसले. ज्या मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही, त्या मतदान केंद्रात संतोष बांगर चक्क मोबाईल घेऊन गेले. एवढ्यावरच हे महाशय थांबले नाहीत, त्यांनी ईव्हीएम मशीनसमोर मोबाईल कॅमेराही सुरु केला.
संतोष बांगर मतदान करताना त्यांच्या कार्यकर्त्यांचा गराडाही पडला होता. कार्यकर्त्यांनीही मोबाईल कॅमेरे सुरु ठेवले होते. एवढं कमी की काय संतोष बांगर यांनी ईव्हीएमजवळ घोषणाबाजीही केली. हा सगळा ड्रामा केल्यावर, नियमांचं वस्त्रहरण केल्यावरही संतोष बांगर यांचं मन भरलं नाही. त्यांनी त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या महिला मतदाराला बांगर यांनी मतदानाबाबत विचारायला सुरुवात केली.
हे सगळं सुरु असताना मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाच्या एकाही कर्मचा-यानं आमदार साहेबांच्या या कृतीवर आक्षेप घेतला नाही. त्यामुळं निवडणूक आयोगावरही टीका होतेय. शिवाय दोन ते तीन टर्म आमदार असलेल्या संतोष बांगर यांच्या वागण्यावरही टीका होऊ लागलीये.
निवडणूक आयोगानंही झालेल्या प्रकाराबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. पण झालेल्या प्रकाराबाबत सांगतानाही निवडणूक निर्णय अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली वाटले. संतोष बांगर यांच्या झुंडशाहीच्या, बेलगाम वर्तनामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही संतप्त झाले. संतोष बांगर यांनी आपण काय वागतो कसं वागतो याचा विचार करावा अशा शब्दात फडणवीसांनी त्यांना सुनावलं.
संतोष बांगर हे आमदार आहेत. गल्लीबोळातला गुंड नाही. विधिमंडळात कायदे करणारे लोकप्रतिनिधी गुंडमवाल्यासारखे वागू लागले तर सामान्यांनी त्यांच्यापासून काय आदर्श घ्यावा?. संतोष बांगर यांच्यासारखे आमदार महाराष्ट्राचं राजकारण कलंकित करतायेत असं खेदानं म्हणावं लागेल.
FAQ
१. प्रश्न : हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात नेमकं काय केलं?
उत्तर : शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन प्रवेश केला, ईव्हीएम मशीनजवळ उभं राहून घोषणाबाजी केली, मोबाईलने व्हिडिओ काढला आणि एका वृद्ध महिला मतदाराला (आजीला) “ते सांगतील तेच बटन दाबायला” सांगितलं. यामुळे मतदानाच्या गुप्ततेचा भंग झाल्याचा गंभीर आरोप आहे.
२. प्रश्न : या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई झाली आहे?
उत्तर : निवडणूक आयोगाला तक्रार केल्यानंतर हिंगोली पोलिसांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर भारतीय दंड संहिता व लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी दबावात असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
३. प्रश्न : मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया आहे?
उत्तर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “आमदार असूनही असे बेलगाम वागणे योग्य नाही, आपण कसे वागतो याचा विचार करावा.” त्यामुळे पक्षातही बांगर यांच्यावर नाराजी आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



