
प्रफुल्ल पवार, झी 24 तास महाड, रायगड : रायगडच्या महाडमध्ये हायहोल्टेज राडा झाल्याचं पाहायला मिळालं. महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आणि याच राड्यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने आपल्यावर रिवॉल्वर रोखल्याचा आरोप युवासेना नेते विकास गोगावले यांनी केलाय.. या रिव्हॉल्वर रोखण्याच्या प्रकरणानंतर महाडमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळाला.
रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधला वाद काही नवा नाही आहे. आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गोगावले आणि राष्ट्रवादीमधील या वादाचा पुन्हा एकदा भड़का उडाला आहे. यावेळी महाडमध्ये मतदान केंद्रांना भेट देत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांसमोरच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. याच राड्यादरम्यान आपल्यावर पिस्तूल उगारण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते विकास गोगावले यांनी केली आहे. आणि यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते उगाललेलं पिस्तूल गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी हिसकावून घेतलं. आणि हे पिस्तूल घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह विकास गोगावले पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी हे पिस्तूल पोलिसांकडे जमा केलं.
तर या पिस्तूल रोखण्याच्या प्रकारानंतर विकास गोगावले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला आहे. पराभव दिसत असल्याने तटकरेंनी हा रडीचा डाव सुरू केल्याचा आरोप विकास गोगावले यांनी केला आहे.
तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विकास गोगावले यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.. तर जे हिस्ट्री शिटर आहेत यांनी असा आरोप करू नये असं म्हणत गोगावले पितापूत्रांवर हल्लाबोल केला आहे.
तर राष्ट्रवादीच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप यांनीही विकास गोगावले यांचा आरोप फेटाळला आहे. उलट विकास गोगावले सकाळपासून वातावरण बिघडवत असल्याचा आरोप जगताप यांनी गोगावलेंवर केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुशांत जाबरे यांना घेरून गोगावले यांनी मारहाण केल्याचा आरोपही जगताप यांनी केला आहे.
रायगडमधील तटकरे आणि गोगावलेंमधील वाद काही नवा नाही आहे. पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि आदिती तटकरेंमध्ये निर्माण झालेला वाद काही केल्या शमण्याचं नाव घेत नाही आहे. त्यात या ना त्या कारणाने या दोन्ही नेत्यांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचा भडका उडत असतो.. आता नगर परिषदेच्या मतदानादिवशीच रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



