digital products downloads

महाराष्ट्राच्या राजकारणाला गुन्हेगारीची कीड लागलीय का?; गुंडांच्या राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर

महाराष्ट्राच्या राजकारणाला गुन्हेगारीची कीड लागलीय का?; गुंडांच्या राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर

महाराष्ट्राच्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण गेल्या काही वर्षांत वेगानं होत चाललंय. पुण्यातील निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या निमित्तानं गुन्हेगारांच्या राजकीय कनेक्शनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. निलेश घायवळबाबत वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. निलेश घायवळचा विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ पहिल्यांदा समोर आलाय. या व्हिडिओनंतर लगेचच रोहित पवारांचा सचिन घायवळसोबतचा फोटो समोर आला. या निमित्तानं गुंडांच्या राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सुसंस्कृत राजकारण अशी देशभरात प्रतिमा आहे. ही नाण्याची एक बाजू असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात गुन्हेगार आणि राजकीय नेत्यांची कायम छुपी युती राहिलीये. अगदी मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तान असो की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद या मोठ्या गँगस्टर्सबाबत कायम कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांमध्ये सहानुभूतीची भावना राहिलेली आहे.मुंबईचा पहिला डॉन म्हणून हाजी मस्तानची ओळख होती. हाजी मस्ताननं जोगेंद्र कवाडेंसोबत दलित-मुस्लीम सुरक्षा महासंघ नावाचा पक्ष काढला. निवडणूकही लढवली. पण त्यांना त्यात यश मिळालं नाही. पुढं जोगेंद्र कवाडेंनी पिपल्स रिपब्लिकन पार्टी काढून आपला वेगळा मार्ग निवडला. तर हाजी मस्तानचा पुढच्या काळात अस्त झाला. गँगस्टर मन्या सुर्वे याचाही राजकीय मिरवणुकीतला एक फोटो सोशल मीडियावर अधूनमधून दिसत असतो. दाऊद टोळीबाबतही काही राजकीय नेत्यांना सहानुभूती होती. काही गँगस्टर्सनं दिल्ली ते मुंबई विमानप्रवास एका बड्या नेत्यासोबत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अंडरवर्ड डॉन छोटा राजनचा लहान भाऊ दीपक निकाळजे यांनीही राजकारणात स्वतःला आजमावून पाहिलं. त्यांनी अनेक निवडणुकाही लढवल्या पण त्यांना लक्षणीय यश मात्र मिळालं नाही. 

मुंबईच्या पलिकडं उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी नावाच्या माफियाचा उदय झाला होता. 1980 पासून गुन्हेगारी क्षेत्रात वावरणारा पप्पू कलानी 1986 मध्ये तत्कालिन उल्हासनगर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आला. 8 खून आणि 19 गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला पप्पू कलानी 1990 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आला. तर पुढं जेलमध्ये राहून दोन वेळा त्यानं आमदारकीची निवडणूक जिंकली. पप्पू कलानीचे राजकीय नेत्यांशी असलेले घनिष्ट संबंध कायम चर्चेचा विषय राहिले.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची राजकारणातली एंट्री मात्र धमाकेदार अशीच राहिली. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यानं राजकारणात प्रवेश करताना अखिल भारतीय सेना नावाचा पक्षच काढला. डॅडीच्या पक्षाला सुरुवातीला कमालीची लोकप्रियता मिळाली.डॅडीच्या कार्यशैलीमुळं पहिल्याच 2004च्या निवडणुकीत डॅडी आमदार झाला. कमलाकर जामसांडेकर प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेप झाली. त्यामुळं अखिल भारतीय सेनेची लोकप्रियता कायम राहिली नाही. पण मुंबई महापालिकेत त्यांचे नगरसेवक निवडून येत राहिले. आणि हो अरुण गवळीचा पक्ष असला तरीही कायम सत्ताधारी त्यांचा पाठिंबा घेत राहिले. 

काळ बदलला गुन्हेगारही बदलले.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानात पळून गेला. गुन्हेगारी टोळ्यांचं पोलिसांनी कंबरडं मोडून टाकलं. रस्त्यावरचं टोळीयुद्ध थांबलं. पण गुन्हेगारी विश्वातल्या भाईंना आता राजकीय नेत्यांच्या अंगावरच्या पांढराशुभ्र खादीची भुरळ पडू लागली होती. गुन्हेगारीचं स्वरुप बदललं होतं. गुंडही आता राजकीय नेत्यांच्या अधिकच जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागले. नाही म्हणायला राजकीय नेत्यांनाही गुन्हेगारी विश्वातल्या भाईंची राजकारणात गरज होतीच. गुंड यापूर्वी राजकीय नेत्यांचे कधीही कार्यकर्ते झाले नव्हते. गुंड फक्त नेत्यांसाठी लपवून ठेवण्याचं शस्त्र होतं. दहशत माजवण्यासाठी, निवडणुकीत बूथ कॅप्चरिंगसाठी या गुंडांचा वापर केला जात होता. पण गुंडांसोबत आपलीही गुंड म्हणून गणना होईल या भीतीनं कोणीही गुंडांना कार्यकर्त्यांचा दर्जा दिला नव्हता. पण जसा काळ बदलला तसा गुंड नेत्यांचे कार्यकर्ते म्हणून मिरवू लागले. नेत्यांसोबत पांढरे कुर्ते घालून नेत्यांनी मिरवण्यास सुरुवात केली. दुसरीकडं विकासाचा वारु महाराष्ट्रात चौखुर उधळला होता. पुणे शहर पेठांच्या बाहेर पडून विस्तारलं होतं. मुळशीपासून तळेगावपर्यंत पुण्याची वेस विस्तारली होती. भाई आता भूमाफिया झाले होते. नेत्यांचे हस्तक म्हणून ते तिथं वावरत होते. 

गुन्हेगारांना राजकीय संरक्षण हवं असतं. सत्ताधा-यांसोबत असलो की पोलीस हात लावत नाही असं कायम गुन्हेगारांना वाटतं. शिवाय राजकीय नेते वेगवेगळ्या पद्धतीनं या गुन्हेगारांना राजकीय संरक्षणाची सावली देत असतात. गुन्हेगार जसे नेत्यांचे लेफ्ट आणि राईट हँड झाले तसे गुंडांच्याही राजकीय महत्वाकांक्षांना पालवी फुटू लागली. गुंड आता थेट राजकीय आयडॉलॉजी स्वीकारुन वेगवेगळ्या पक्षांची उपरणी खांद्यावर घेऊ लागले होते. गुन्हेगारांचं राजकीयीकरण म्हणजे अनेक गुन्हेगारांचे नातेवाईक, स्वतः गुंड नगरसेवक झाले. काही गुंडांनी त्यापेक्षाही मोठं होण्याची स्वप्नं पाहिली. काही राजकीय नेत्यांनी आपली दोन नंबरची कामं थेट या गुंडांना देऊन टाकली होती. परळीचा वाल्मिक कराड हा पवनचक्की कंपन्यांकडून खंडणी वसूल करत होता. औष्णिक प्रकल्पाच्या राखेतून हा माफिया उभा राहिला होता. राजकारणातली स्थानिक पातळीवरची सगळी बेरीज वजाबाकी तोच पाहायचा. पुण्याच्या गजा मारणे जेलमधून आतबाहेर करत असतो. पण त्याची बायको एका राजकीय पक्षाची पदाधिकारी होती. वर्षभरापूर्वी हत्या झालेला शरद मोहोळ स्वतःची हिंदू डॉन म्हणून प्रतिमा तयार करत होता. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष त्याच्याशी सहानुभूतीही बाळगून होते.

सचिन घायवळ आणि निलेश घायवळ यांनीही तर यावर कळस चढवल्याचं पाहायला मिळालं. निलेश घायवळ हा तसा पुण्यातला गुंड. पण 2020 नंतर त्यानं त्याचा कारभार पुण्याच्या बाहेर हलवला होता. त्याला राजकारणात थेट प्रवेश करायचा होता. त्यासाठी त्यानं वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी सलगी वाढवली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातही त्यानं जामखेड परिसरात आपली दहशत निर्माण केली होती. राम शिंदेंच्या प्रचारात तो फिरताना दिसला.रोहित पवारांच्या मातोश्रींकडून त्यानं स्वतःचं कौतुक करवून घेतलं. सचिन घायवळचे रोहित पवारांसोबत फोटोही व्हायरल झाले. निलेश अहिल्यानगर बीड धाराशिव या जिल्ह्यातल्या पवनचक्की कंपन्यांकडून प्रोटेक्शन मनी वसूल करण्यास सुरुवात केली होती. पवनचक्की कंपन्यांकडून घेतलेला सगळा पैसा निलेश घायवळ स्वतःकडंच ठेवत होता का? तर नाही. राजकीय नेत्यांना तो पैसा हवा होता यासाठी त्यांना फ्रंटमॅन म्हणून घायवळसारखे गुंड हवे होते.

गुन्हेगार शेवटी गुन्हेगार असतात. गुन्हेगारांचा लगेचच बकासूर होतो. त्यांना सगळं काही मिळवण्याची खूप घाई असते. राजकीय नेत्यांसारखी ते संधीची वाट पाहत नाही. निलेश घायवळ, वाल्मिक कराडसारखे गुंड आज उघडे पडले. त्यांची राजकीय उपयुक्तता संपली म्हणजे ते राजकारण गुन्हेगारीमुक्त झालं असं नाही. निलेशची जागा घेणारा दुसरा बकासूर राजकीय नेत्यांनी शोधलाच असेल. वाल्मिक कराडची सगळी कामं आता दुसरा कोणीतरी वाल्मिक सांभाळायला लागला असेल. महाराष्ट्राचं राजकारण आता बिहार, यूपीपेक्षाही पुढं गेल्याचं बोललं जाऊ लागलंय. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वेगानं होत चाललेलं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी नेत्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल. स्वतःच्या स्वार्थासाठी गुन्हेगाराची विषवल्ली नेतेच राजकारणात आणू लागलेत. त्यांना छोटी मोठी पदं देऊन आपलं काम काढून घेणं बंद केलं पाहिजे. नगरसेवक झालेल्या गुंडांना आमदार खासदार होण्याची स्वप्नं पडू लागतील. एकदा का बहुसंख्यांक गुंड राजकारणात स्थिरावले की ते शालिन राजकारणाची धुरा वाहणा-या राजकीय नेत्यांचा आणि राजकारणाचा निकाल लावतील. आता सत्तेत वाटा मागणारे गुन्हेगार एक दिवस नेत्यांचं राजकारणही काबीज करतील. आता नेत्यांनीच ठरवायचंय की शहाणं व्हायचं की महाराष्ट्राच्या राजकारणाला बदनाम करायचं. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp