
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) स्वाभाविक दावा असल्याचे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. टिंगरे यांनी पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शहराचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, विरोधी पक्षनेते निलेश निकम आणि राकेश कामठे उपस्थित होते. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे, तर २२ जून रोजी मतमोजणी पार पडेल. पुणे मतदारसंघात एकूण ८६७ सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७९८ निर्वाचित आणि ६९ नियुक्त सदस्यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील संख्याबळ स्पष्ट करताना सुनील टिंगरे यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, जिल्ह्यातील १८ नगरपरिषदा व नगरपंचायती, तसेच ३ कॅन्टोन्मेंट बोर्डांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. एकूण ८६७ सदस्यांपैकी सर्वाधिक, म्हणजेच तब्बल ३७० सदस्य हे एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत. त्याखालोखाल भाजप आणि इतर पक्षांचे सदस्य आहेत. पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा आमच्या हक्काची असून, ती राष्ट्रवादीलाच मिळावी अशी आग्रही मागणी आम्ही पक्षप्रमुखांकडे केली असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले. महायुतीमधील मित्रपक्षांना सूचक इशारा देताना टिंगरे म्हणाले की, केवळ राजकीय भूमिकेसाठी किंवा अनाठायी वाद निर्माण करण्यासाठी जर कोणी या जागेवर दावा करत असेल, तर ते योग्य नाही. राष्ट्रवादीने महायुतीमध्ये नेहमीच समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमच्या हक्काच्या जागेबाबत मित्रपक्षांकडूनही त्याच संवेदनशीलतेची अपेक्षा आहे. या निवडणुकीत अपक्षांसह सर्व मित्रपक्ष आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






