
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी ते शनिवारी सकाळी भिवंडी न्यायालयात हजर राहणार असून, यावेळी ते नवीन जामीनदार सादर करणार आहेत. या नवीन जामीनदाराची ओळख सध्या गोपनीय ठेवण्यात आली असली तरी, शनिवारी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान त्या नावाचा उलगडा होणार आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भिवंडी महानगरपालिकेची आगामी महापौर निवडणूक आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर ते काय भाष्य करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू असून, शनिवारी ते या प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी न्यायालयात हजर राहणार आहेत. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर राहुल गांधींना आता नवीन कायदेशीर पूर्तता करावी लागणार आहे. राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी त्यांच्या उपस्थितीची पुष्टी केली असली तरी, सुरक्षिततेच्या कारणास्तव नवीन जामीनदाराचे नाव अद्याप गोपनीय ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात या नावाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी (20 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात हजर राहिल्यानंतर राहुल गांधी यांना आता सलग दुसऱ्या दिवशी कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. सुलतानपूरमधील सुनावणी आटोपून ते थेट महाराष्ट्रातील भिवंडीत दाखल होणार असून, सलग दोन दिवस दोन वेगवेगळ्या राज्यांतील न्यायालयांत हजर राहण्याच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. राहुल गांधी यांच्या भिवंडी दौऱ्याकडे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर ते स्थानिक नेत्यांशी नेमकी काय चर्चा करतात आणि कोणती नवी रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विशेष म्हणजे, भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धूळ चारत, भाजपचेच बंडखोर नारायण चौधरी यांच्या मदतीने महापौर आणि उपमहापौर पदे काबीज केल्याच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी हा दौरा होत आहे. या ऐतिहासिक विजयानंतर राहुल गांधींच्या आगमनामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यातून पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



