
Aasha bhosle On Thackeray Brothers: आपल्या सुमधुर आवाजाने गेली आठ दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले आपल्या स्पष्ट विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. दोन वर्षांपुर्वी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. यादरम्यान आशा भोसले एकनाथ, शिंदे, आशिष शेलार, राज ठाकरे यांच्यासोबत मंचावर दिसल्या. सध्या राज्यात हिंदीसक्तीवरुन वातावरण तापलं असताना आशा भोसले यांना त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी दिलेल्या प्रश्नाची सध्या चर्चा रंगलीय.
मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र मोर्चा काढणार आहेत. दोन्ही पक्षांनी आपण जाहीर केलेल्या तारखांमध्ये बदल केला असून, आता 5 जुलैला हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदीसक्तीवरुन सत्ताधाऱ्यांविरुद्ध विविध पक्ष, संघटना एकत्र येणार आहेत. या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मंचावर असतील. यासंदर्भात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘राजकारणात मी फक्त आशिष शेलार यांना ओळखत असल्याचं आशा भोसले यांनी उत्तर देताना म्हटलंय. पत्रकारांनी राज, उद्धव ठाकरे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नांवर आशा भोसले यांनी ही प्रतिक्रिया दिलीये.
राज आणि आशा भोसले एका मंचावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशा भोसले यांचे घरचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये अभिजात पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात राज यांनी आशा भोसलेंना निमंत्रित केले होते. त्याआधी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा किस्सा आशा भोसलेंनी सांगितला होता. “मराठी भाषा इतकी गोड, लवचिक आहे. मधाचा थेंब कानात पडल्यानंतर ओघळत ह्रदयापर्यंत जाऊन पोहोचतो अशी ही भाषा आहे. या भाषेला दुधारी तलवारही आहे आणि अवधान जर नाही ठेवलं तर काहीही अर्थ निघून जातो. ऱ्हस्व, दीर्घ सगळं काही पाहावं लागतं. चार-पाच दिवसांपूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला. ते फार उत्साहात होते. ते मला त्यांच्या ठाकरे आवाजात म्हणाले, आशाताई मला तुम्ही 27 तारखेला काही झालं तर संध्याकाळी 6 वाजता हव्यात. मी त्यांना म्हटलं, ’60 वर्षं उशीर झाला बरं का’. त्यावर त्यांनी काव्यवाचन करायचं आहे आणि जरुर यायचं आहे असं सांगितलं,” असा किस्सा आशा भोसले यांनी सांगताच सर्वांना हसू अनावर झालं.
मराठी भाषेवर काय म्हणाल्या होत्या?
पुढे त्यांनी सांगितलं की, “वाचनामुळे भाषा शुद्ध होते. मराठी भाषा टिकवायची असेल तर आईने मराठीत बोललं पाहिजे. आई मुलाला संस्कार देते, भाषा शिकवते. जर आईच मराठी नसेल, किंवा समजत नसेल तर मुलगा मराठी कसा शिकणार? आजच्या जगात इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे. पण आपली मातृभाषा टिकवूनही इंग्रजी शिकता येतं. आईने बोलली तर मातृभाषा येईल. आजकाल मराठी लोक घऱात इंग्रजीच बोलतात. हे गुड मॉर्निंग….आता आई आणि मुलीने एकमेकीला सुप्रभात म्हणावं”.”मराठी शाळांमधून एक तास मराठी पुस्तक, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रसारखं त्याचं एक पान रोज वाचावं. हे पुस्तक आईकडेही पोहोच करावं. इंग्रजांनी लिहिलेला नाही तर आपला खरा इतिहास त्यांना कळला पाहिजे,” असंही मत त्यांनी मांडलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.