
Devendra Fadnavis on Maharashtra Nagar Parishad Election 2025 Result New Date: हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने उद्या होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द केली आहे. 20 डिसेंबरला उर्वरित ठिकाणी मतदान झाल्यानंतर 21 डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केला आहे. निकाल, निवडणूक पुढे जात आहेत. ही काही योग्य पद्धत नाही. निवडणूक आयोग, खंडपीठ स्वायत्त आहे त्यामुळे ते मान्य करावं लागेलं. पण यातून भ्रमनिरास होतो. काही चूक नसताना असं होणं योग्य नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हायकोर्टाच्या निकालावर भाष्य करताना म्हटलं की, “मी निकाल वाचलेला नाही. पण जर खंडपीठाने निर्णय दिला असेल तर तो मान्य करावा लागेल. पण जवळपास गेली 25-30 वर्षं मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे. पण असं पहिल्यांदा घडत आहे की, घोषित केलेल्या निवडणुका, त्यांचे निकाल पुढे चालले आहेत. ही पद्धत फार योग्य वाटत नाही. अर्थात खंडपीठ स्वायत्त असल्याने त्यांचा निर्णय मान्य करावा लागेल”.
पुढे त्यांनी म्हटलं की, “जे उमेदवार मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात त्यांचा भ्रमनिरास होतो. आपली काही चूक नसताना, फक्त यंत्रणेच्या अपयशामुळे अशा पद्धतीने गोष्टी होणं योग्य नाही. निवडणूक आयोगाला अजून खूप निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यांनी आपल्या प्रक्रियेत सुधारणा केली पाहिजे आणि पुढच्या निवडणुकीत असं होणार नाही हे पाहिलं पाहिजे”.
11.36am | 2-12-2025Mumbai.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/UzgYHS4vHK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 2, 2025
“माझं मत असं आहे की, जो काही कायदा आहे त्याचं चुकीचे इंटरप्रिटेशन करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत माहिती नाही, पण त्यांचा आदर राखून सांगतोय की, अतिशय चुकीचा अर्थ लावला आहे. इतकी वर्षं आम्हीही या निवडणुका लढवत आहोत, आम्हालाही नियम माहिती आहेत. मीदेखील अनेक वकिलांशी सल्लामसलत केली आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
“जिथे सगळ्या गोष्टींचं पालन झालं आहे तिथे कोणीतरी कोर्टात गेलं. कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही. पण फक्त कोर्टात गेल्याने निवडणुका पुढे नेणं हे कोणत्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचं घडलं आहे. मी त्याबाबत अधिक बोलणार नाही. मी यासंदर्भात वैयक्तिक नाराजी आधीही प्रकट केली असून, ती निवडणूक आयोगावर नसून कायद्यावर आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. “फक्त 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत, म्हणून सगळी मतमोजणी पुढे करणं मला तरी योग्य वाटत नाही,” असंही ते म्हणाले.
शिवसेना नेते संतोष बांगर यांनी मतदान केंद्राबाहेर दिलेल्या घोषणांसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत आपण कसे वागत आहोत, काय संकेत देत आहोत याचा विचार केला पाहिजे”.
कोकणात पैसे वाटप झाल्यासंदर्भातविचारलं असता त्यांनी सांगितलं की, “सगळेच एकमेकांवर आरोप करतात. निवडणूक आयोग आणि पोलीस सतर्क आहेत. कुठे गडबड झाली तर कायदेशीर कारवाईही केली जात आहे. मला वाटतं एकूणच शांतपणे निवडणुका पार पडल्या आहेत. काही ठिकाणी तणाव आहे, टोकाचे मतभेद झाले आहेत. पण तेदेखील योग्य नाही”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



