
Devendra Fadnavis on Central Government: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा पक्षात फक्त राज्यात नाही तर देश पातळीवरही महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास आणि नेतृत्व कौशल्य यामुळे नेहमीच त्यांचं कौतुक होत असतं. यामुळे इतर राज्यातील निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीस यांना सहभागी केलं जातं. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांमध्ये गणना होणारे देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा मागील अनेक काळापासून सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा हे दावे फेटाळून लावले आहेत. राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्याचे संकेत दिले आहेत.
2029 मध्ये केंद्रात जायला सांगितलं, तर जाऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. मला माझ्या सध्याच्या कार्यकाळात खूप बदल करायचे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत असं म्हटलं आहे. माझ्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला कसा देता येईल यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 2029नंतर पक्ष ठरवेल ती जबाबदारी घेईन असंही त्यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षानंतर स्वत:ला कुठे पाहता असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “सध्याचा माझ्या कार्यकाळात मला परिवर्तन घडवायचं आहे. रोजचे प्रश्न राहणार आहेत. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी असते. त्याला सामोरं जावं लागतं, कारण आपला महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर कराव्या लागतात. पण हे करत असताना आपल्याला परिवर्तन कसं घडवता येईल, शाश्वत कसं करता येईल याच्याकडे मला अधिक लक्ष द्यायचं आहे”.
“आपलं सरकार संस्था म्हणून कसं उभारता येईल. माणूस येतो, माणूस जातो, पद्धती बदलत जातात. असं न करता सरकार एक संस्था म्हणून कसं उभारता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. आर्थिक शाश्वतता कशी आणता येईल याचा विचार करायचा आहे. पायाभूत सुविधा आणि इंडस्ट्री यामध्ये ऑटो पायलट मोडवर कसे जाऊ यासंदर्भात माझी योजना आहे. त्यामुळे मला वाटतं की, मी एक अनुभवी म्हणून मुख्यमंत्री पदावर बसलो आहे. मी प्रशासन आतून बाहेरुन पाहिलं आहे. अडचणी काय येतात त्याची कल्पना आहे. या अनुभवाचा महाराष्ट्राला कसा देता येईल यासाठी प्रयत्न आहे”.
2029 पर्यंत पूर्ण क्षमतेने काम करायचं हा माझा प्रयत्न आहे. 2029 नंतर पक्ष ठरवेल ती जबाबदारी घेईन असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



