
वाढत्या जागतिक प्रगतीनुसार आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आज राज्यसभेत तीन महत्त्वाची विधेयके मांडली. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी धोरणदृष्टीशी सुसंगत असलेल्या या पावलामुळे जनतेची आरोग्य सुरक्षा, ग्राहक संरक्षण आणि वैद्यकीय उपचारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश होऊन आरोग्य यंत्रणेला अधिक बळ मिळणार आहे. कोविड-19 महामारीच्या काळात वैद्यकीय ऑक्सिजनच्या साठवणूक आणि वितरणातील त्रुटींमुळे उद्भवलेले गंभीर धोके लक्षात घेऊन, ऑक्सिजनचे सुरक्षित उत्पादन, साठवणूक आणि वापरासाठी ‘राष्ट्रीय वैद्यकीय ऑक्सिजन सुरक्षितता व विश्वासार्हता विधेयक’ मांडण्यात आले आहे. या विधेयकाद्वारे ऑक्सिजनची गुणवत्ता मानके, अनुज्ञापन आणि ‘उत्कृष्ट उत्पादन प्रक्रिया’ यांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्राधिकरणांची स्थापना करण्यात येणार आहे. दूषित ऑक्सिजनमुळे होणारे मृत्यू रोखणे आणि रुग्ण सुरक्षितता जपून आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे, हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरीच्या वाढत्या व्यापासोबतच डिलिव्हरी बॉईजकडून होणाऱ्या चोरी, दरोडा, रेकी आणि अत्याचारासारख्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी वितरण प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन साहित्य पुरवठा कर्मचारी पूर्ववृत्त पडताळणी विधेयक, 2026 सादर करण्यात आले आहे. या विधेयकाद्वारे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची अधिकृत नोंदणी आणि त्यांच्या पार्श्वभूमीची कडक पडताळणी अनिवार्य केली जाणार असून, यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेत पारदर्शकता, विश्वास आणि सुरक्षितता निर्माण होण्यास मदत होईल. दुसरीकडे, आरोग्य सेवा, निदानात्मक संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यासाठी देखील विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर करताना तो नैतिक, सुरक्षित आणि मानवी देखरेखीखाली असावा, हे सुनिश्चित करणे या विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सेवा अधिक दर्जेदार आणि अचूक बनवतानाच, मानवी आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन वैद्यकीय क्षेत्राचे सक्षमीकरण करण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



