
अमरावती येथील मूळ रहिवासी आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांच्या ‘सातपुड्याचा सातबारा’ या पुस्तकाला सर्वोत्तम संशोधनात्मक पुस्तक श्रेणीतील साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक म्हणून रिठे परिचित आहेत. रिठे यांनी संपूर्ण सातपुडा पर्वतराजीत तब्बल ३५ वर्षे वने व वन्यजीव संरक्षणाचे कार्य केले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवावर आधारित ‘सातपुड्याचा सातबारा’ हा ६४७ पानांचा ग्रंथ नुकताच पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. हे त्यांचे चौथे पुस्तक असून, यापूर्वी त्यांनी ‘रानावनाचे मूडस’, ‘हिरवा संघर्ष’ (मराठीत) आणि ‘सातपुडा’ (इंग्रजीत) ही पुस्तके लिहिली आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय निवड समितीने या पुस्तकाची सर्वोत्तम संशोधनात्मक पुस्तक म्हणून निवड केली. या पुरस्कारांचे वितरण आगामी २४ मार्च रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात एका विशेष समारंभात करण्यात येणार आहे. पुरस्काराची घोषणा होताच, पद्मगंधा प्रकाशन, महाराष्ट्र पक्षिमित्र, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, सातपुडा फाउंडेशन, निसर्ग संरक्षण संस्था अमरावती तसेच महाराष्ट्रातील पर्यावरण विषयक कार्यरत अनेक संघटनांच्या सदस्यांनी किशोर रिठे यांचे अभिनंदन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



