
Maharashtra Weather News : देशभरात हवामानाची विचित्र स्थिती आणि सातत्यानं होणारे बदल पाहायला मिळत असून, हे बदल एका उष्ण, अति उष्ण पर्वाकडे खुणावताना दिसत आहेत. सध्या मध्य भारतासह महाराष्ट्रात तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच काही राज्यांमध्ये मात्र पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होताना दिसत आहे. दर, पश्चिमी झंझावातामुळं उत्तराखंड, हिमाचल प्रगदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतीय भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 22 ते 26 फेब्रुवारीदरम्यान तेलंगणा, छत्तीसगढ, झारखंडमध्ये वादळी पावसाचा इशारा यअसून, दक्षिण भारतात केरळ आणि तामिळनाडूलाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात या प्रणालीहा परिणाम दिसून येईल असाही प्राथमिक अंदाज आहे.
मुंबईत तप्तपर्वाची सुरुवात…
एप्रिल मे महिन्यात सहसा उकाडा प्रचंड वाढतो. मात्र यंदाच्या वर्षी फेब्रुवारीतच ही स्थिती ओढावल्यामुळं आतापासूनच एका तप्त पर्वाची सुरुवात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबईचा पारा 36.3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, हा आकडा आतापासूनच चाळीशीच्या दिशेनं जाताना पाहून अनेकांनाच धडकी भरत आहे. ही स्थिती शहरात पुढील 48 तास कायम राहणार असून, तापमान 34 ते 35 अंशांदरम्यान असेल असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामानात आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्या कारणानं उष्मा अधिक जाणवेल. दुपारच्या वेळेत ही स्थिती अधिक तापदायक ठरणार असून, 11 ते 4 या वेळेत हा दाह असह्य होईल. मंगळवारनंतर या स्थितीत किमान दिलासा मिळणार असून नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडत असताना आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे.
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील तापमानासह हवामानातही पुढील काही दिवस सतत चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान प्रामुख्यानं मराठवाडा, मध्य महाराष्ट्र यासोबतच विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, लातूर, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली, धाराशिव, चंद्रपूर या भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
पर्यटनस्थळांवर काय स्थिती?
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये नव्यानं एक पश्चिमी झंझावात सक्रिय होताना दिसत असून, अतीव उंचीवर असणाऱ्या लाहौल स्पिती, किन्नौर, कुल्लू, चंबा या भागांमध्ये पाऊस आणि हिमवर्षावाची शक्यता आहे. तर, उत्तराखंडच्या रूद्रप्रयाग, चमोली, उत्तरकाशी, बागेश्वर आणि पिथौरागढमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आणि हिमवर्षावाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतामध्ये पावसाचं सावट कायम राहणार असून, प्रामुख्यानं किनारपट्टी भागांना तूफान पावसाचा इशारा देण्यात आल्यानं देशातील पर्यटनस्थळांवरील ही स्थिती आणि हवामानाचं पूर्वानुमान पाहूनच प्रवासाचे बेत आखावेत असं आवाहन केलं जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



