
Nitesh Rane on Tree Cutting in Tapovan: नाशिक शहरात 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभेमळ्याच्या साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील 1800 झाडे तोडण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी ग्रीन मार्किंग सुरू करण्यात आलं आहे. कुंभमेळ्याला येणाऱ्या साधू-महंतांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तपोवन परिसरात 1500 एकरावर साधूग्राम उभारलं जाणार आहे. यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार असल्याने पर्यावरणवादी आणि नाशिककर रस्त्यावर उतरले आहेत. राजकीय पक्षांकडूनही विरोध केला जात असताना, नितेश राणे यांच्या एका विधानाने वाद पेटला आहे. तपोवन वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी बकरी ईदला गप्प का? असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला असून, यावरुन वाद पेटला आहे.
नितेश राणेंनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का ? सर्व धर्म सम भाव ? असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे.
तपोवन मधल्या वृक्ष थोड ची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच..
ईद च्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत..
तेव्हा गप्प का ?
सर्व धर्म सम भाव ?— Nitesh Rane (@NiteshNRane) December 4, 2025
झाडाप्रमाणे बकरीला का मिठी मारत नाही?
आपल्या विधानावरुन वाद पेटल्यानंतर नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी झाडाला मिठी मारतात, तसं बकरीला का मिठी मारत नाही? असा प्रश्न विचारला. “ईदमध्ये मोठ्या प्रमाणात बकरींची हत्या होते आणि रक्ताचे पाट वाहत असतात तेव्हा हे पर्यावरणवादी आवाज उठवताना दिसत नाहीत. व्हर्च्युअल बकरी ईद करा असं कधीच बोलताना दिसत नाहीत. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा कशाला असा प्रश्न मी विचारला आहे. झाडं जगली पाहिजेत हा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य मुद्दा आहे. पण जसं झाडाला मिठी मारतात, तसं बकरीला का मिठी मारत नाही? असा साधा प्रश्न मी विचारला आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.
‘ऑक्सिजन देतं, देत नाही हा वेगळा मुद्दा आहे’
“बकरी हा प्राणी नाही का? सोसायटी आणि घरांमध्ये बकरी ईदच्या वेळी रक्त वाहताना दिसत असतं. तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात? इतकाच माझा साधा प्रश्न आहे. कोण ऑक्सिजन देतं, देत नाही हा वेगळा मुद्दा आहे. विजय वडेट्टीवारांनी मूळ मुद्द्यावरुन लक्ष वळवू नये. ते विसरले असतील की काँग्रेस नेत्याऐवजी ते हिंदू आहेत. आपल्या धर्माच्याच मोठ्या कार्यक्रमाला, सणासुदीला असे प्रश्न विचारले जातात. मग इतर सणांच्या वेळी गप्प का? असा प्रश्न मी विचारला असेल तर त्यात चूक काय?”, असंही त्यांनी विचारलं आहे.
‘हिंदू धर्माला, सणांना सातत्याने टार्गेट केलं जातं’
पुढे त्यांनी म्हटलं की, “कुंभमेळा होत असल्याने वृक्षतोड केली जात आहे हा मुद्दा आहे. साधूग्रामसाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. कुंभमेळ्याचा मुद्दा असताना, इतर धर्मांच्या वेळी का विचारला जात नाही इतकाच प्रश्न आहे. झाडं तोडणं, न तोडणं वेगळा मुद्दा आहे. पण ज्या कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला, सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे त्याच्यावरच प्रश्न विचारत आहे. आपल्याकडे इतका मोठा कुंभमेळा होत असताना, त्याची इतकी मोठी तयारी सुरु आहे. काहींना त्याची एलर्जी झाली आहे, त्यामुळे त्याची बदनामी करणं एककलमी कार्यक्रम आहे”.
‘कुंभमेळा हा भाजपाचा कार्यक्रम आहे का?’
“भाजपा आणि राष्ट्रवादीचा विषय नाही. कुंभमेळा हा भाजपाचा कार्यक्रम आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. हिंदूंच्या सणावर अचानक प्रश्न निर्माण होत असेल, प्रेम निर्माण होत असेल, अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम सुरु होत असेल तर मग इतर धर्माच्या वेळी विरोध का होत नाही हे विचारायला हवं. बकऱ्या का कापल्या जात आहेत? पर्यावरणाचीही हानी होतेच की. रक्ताचं पाणी वाहत जातं. तेव्हा कुठे लपलेले असतात,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



