
Water Shortage In Mumbai: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने पाणी कपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर आहे. सद्यस्थितीत सातही धरणात 28 .42 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात धरण व राज्य सरकारने मंजूर केलेला राखीव साठा जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका आहे. तरीही जून महिन्यात वेळेवर पावसाचे आगमन होईल की नाही याची शाश्वती नसल्याने 15 मे रोजी धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेत पाणी कपातीचा पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
पाण्याची गरज किती आणि उपलब्ध किती?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. परंतु यंदा सातही धरणात 4 लाख 11 हजार 355 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. तर राज्य सरकारकडून 2 लाख 30 हजार 500 मिलियन लिटर राखीव साठा उपलब्ध करण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा व राज्य सरकारने उपलब्ध केलेला राखीव पाणीसाठा मिळून जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका आहे.
तूर्तास तरी पाणी कपातीचा कोणताही निर्णय नाही, मात्र…
जून महिन्यापासून पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र मुंबईत पाणीबाणी परिस्थिती ओढावू शकते. त्यामुळे मुंबईत पाणीबाणी परिस्थिती टाळण्यासाठी आतापासून उपाययोजना करण्यात येत आहेत. तूर्तास तरी पाणी कपातीचा कोणताही निर्णय नाही. मात्र 15 मे नंतर सातही धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
धरणातील पाणीसाठा किती?
21 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा – 68312
मोडक सागर – 29268
तानसा – 33131
मध्य वैतरणा – 66494
भातसा – 199854
विहार – 11105
तुळशी – 3190
मागील तीन वर्षात धरणातील पाण्याची स्थिती कशी
तीन वर्षांत धरणातील पाण्याची स्थिती कशी आहे हे पाहूयात…
2025 – 411355
2024 – 327289
2023 – 424453
(वरील सर्व आकडेवारी ही दशलक्ष लिटरमध्ये आहे.)
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.