
देवगाव फाटा रस्त्यालगत दत्तू बोचरे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. चिकू फळबाग परिसरात काम करणाऱ्या कामगारांना बिबट्या पडलेल्या अवस्थेत दिसून आला. सुरुवातीला परिसरात बिबट्याची हालचाल असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती; मात्र जवळ जाऊन पाहणी केल्यानंतर तो मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ ही माहिती वनविभागाला कळविण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनपरिमंडळ अधिकारी जयप्रकाश शिरसाठ, वनरक्षक विजय दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक बचाव पथक निफाड सदस्य ज्ञानेश्वर पवार, सादिक शेख, वैभव दौंड, विजय माळी वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याचा पंचनामा केला. प्राथमिक माहितीनुसार बिबट्या अंदाजे ५ ते ६ वर्षांचा नर जातीचा असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच त्याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर येथीलच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल दराडे यांच्याकडे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



