
गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शनिवारी धारणी येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते धारणी पोलिसांसाठी फॉरेन्सिक वाहनाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. मेळघाटातील दुर्गम भागांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले की, धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागांच्या समस्या जाणून घेऊन परिसराचा कायापालट करण्यात येईल. मेळघाटातील सुविधा आणि सुरक्षेवर विशेष भर दिला जाईल. आदिवासीबहुल भागाचा दौरा करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. शनिवारी डॉ. भोयर यांनी धारणी पोलीस स्टेशनला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याची पाहणी केली आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. गुन्हे तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी फॉरेन्सिक वाहन महत्त्वाचे ठरेल, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. भोयर यांच्या हस्ते धारणी पोलीस स्टेशन येथील पाणपोईचेही लोकार्पण करण्यात आले. दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मेळघाटच्या सर्वांगीण विकासासाठी योजना राबविण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने धारणी येथे विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासिकेची इमारत बांधण्यात आली आहे. या शैक्षणिक सुविधेबद्दल डॉ. भोयर यांनी लोकप्रतिनिधींचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तकेही वितरित करण्यात आली. यावेळी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनील चौथमल, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गरुड, तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्या चव्हाण, गटविकास अधिकारी विजय गायकवाड, गटशिक्षणाधिकारी वैभव लादे आदी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



