
Pune Accident CCTV: पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघात 8 जणांचा मृत्यू झाला असून, 17 जण जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने रस्त्यात येणाऱ्या सर्व गाड्यांना उडवलं आणि अखेर पेट घेतला. या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. सीसीटीव्हीत आगीत वेढलेला कंटनेर रस्त्यावरुन धावताना दिसत आहे. या व्हिडीओतूनच हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येत आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
कंटेनरने 20 ते 25 वाहनांना चेंडूप्रमाणे उडवत त्यांचा अक्षरश: चुराडा केला आहे. अपघात इतका भीषण होता की, दोन कंटेनरच्या मधे एक कार अडकली होती. अपघातामुळे कंटनेरला आग लागल्यानंतर ही कार प्रवाशांसह जळाली. आगीनंतर कारची राख झाली आहे. कंटनेर चालकही अपघातात ठार झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
कंटनेर नवले पुलाच्या पुढे असणाऱ्या बोगद्यातून पुण्याच्या दिशेन येत होता. उतारावर कंटेनरचा ब्रेक फेल झाला. यानंतर कंटेनरने समोर येतील त्या सगळ्या गाड्यांना धडक दिली. चेंडूप्रमाणे गाड्या रस्त्यावर उडत होत्या. जवळपास 3 किमी कंटेनर वाहनांना धडक देत होता. 20 ते 25 गाड्यांना कंटेनरने धडक दिली. एका क्षणी कंटेनरने दुसऱ्या एका कंटेनरला धडक दिली. यावेळी कार दोन्ही कंटेनरच्या मधे अडकली आणि आग लागली. कार बाहेर पडण्यासाठी जाग नसल्याने आतील प्रवाशांसह ती जळाली आणि राख झाली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागल्यानंतर क्रेनच्या माध्यमातून कंटेनर आणि कारला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच अपघातग्रस्त वाहनांना बाजूला काढण्यात आलं. रस्त्यावर काचा आणि रक्ताचा सडा पडला आहे.
गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला असून लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. तसंच अपघातानंतर तिथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. काही दुचाकींनाही कंटेनरने धडक दिली. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवारांची पोस्ट
पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



