
पुणे शहरात नशेच्या औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत विधान परिषदेत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सविस्तर उत्तर देत या प्रकरणातील कारवाई व तपासाची माहिती सभागृहात दिली. राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, प्रश्नामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या काही औषधांचा वापर वैद्यकीय कारणांसाठी, विशेषतः डिप्रेशनसारख्या आजारांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने केला जातो. त्यामुळे ही औषधे प्रमाणित असून वैद्यकीय उपचारासाठी त्यांचा वापर केला जातो. पुणे शहरात ज्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या, त्या संदर्भात पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वतःहून (सुओ मोटू) कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान काही व्यक्तींकडून औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासात असे आढळून आले आहे की, या औषधांची विक्री कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून झालेली नाही. संबंधित औषधांचे उत्पादन हिमाचल प्रदेशमध्ये झाले असून तेथून मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन देशभर वितरित केले जाते. उत्पादनानंतर विविध वितरकांमार्फत ही औषधे देशातील विविध भागांमध्ये पोहोचवली जातात. या प्रकरणातील तपासात पुढे असेही समोर आले आहे की, पुण्यात सापडलेला औषधांचा साठा हा कुरिअरच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणण्यात आला होता. या पुरवठ्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्यात आली असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहितीही राज्यमंत्री कदम यांनी दिली. यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की, औषधांच्या विक्रीसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संबंधित मेडिकल स्टोअर्सवर नियमितपणे कारवाई करण्यात येते. आवश्यक असल्यास संबंधित दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाईही केली जाते. राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांबाबत अत्यंत गंभीर असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



