
महेंद्र मुधोळकर, झी मीडिया, बीड : (Marathwada Floods Beed News ) मागील दोन आठवड्यांपासून राज्याच्या प्रामुख्यानं मराठवाडा भागाला पावसानं अतीव प्रमाणात झोडपलं. ज्यामुळं या भागातील अनेक भागांमध्ये प्रचंड पूरस्थिती पाहायला मिळाली. गावंच्या गावं उध्वस्त झाली, अनेक संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेले. पाऊस थांबला, पूरही ओसरला. मात्र आता त्यानंतरची परिस्थिती आणखी भीषण असून, मराठवाड्यात एक नवं संकट घोंगावताना दिसत आहे.
पाऊस, पुरानंतर आता भूस्खलनाचा धोका?
बीड तालुक्यात असणाऱ्या कपिलधारवाडी गावाला मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसाने मोठा धोका निर्माण झाला आहे. या गावातील घरं, शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने ग्रामस्थ प्रचंड भयभीत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता तहसील प्रशासनासह भूगर्भ अभ्यासकांनीसुद्धा गावात पाहणी केली. मात्र अद्याप प्रशासनाने ग्रामस्थांसाठी कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत ही वस्तूस्थिती.
तूर्तास कपिलधारकडे जाणारा रस्ता बंद केला असून, तिथं ‘कपिलधारवाडी इथं भूस्खलनामुळं सदर रस्ता बंद करण्यात आला आहे. कपिलधारकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता मांजरसुंभा ते कपिलधार वापरण्यात यावा’ अशी सूचना बीडच्या विभागीय कार्यकारी अभियंत्यांकडून नागरिकांसाठी जारी करणारं फलक लावण्यात आलं आहे.
पुन्हा माळीणसारख्या दुर्घटनेची भीती…
हे गाव डोंगरदरीध्ये वसल्यामुळं आणि गेल्या आठवड्याभरापासून या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळं येथील डोंगर खचले असल्याचं दाहक वास्तव समोर येत आहे. 2014 मध्ये याच घटनेशी साधर्म्य साधणारी अत्यंत दुर्दैवी घटना माळीण इथं घडली, ज्यामध्ये संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेलं होतं. अशाच घटनेची भीती इथंही व्यक्त केली जात आहे.
गावातील जमिनीला गेलेले तडे पाहता आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखत ग्रामस्थांनी स्थलांतरित होत पुनर्वसनाची मागणी केली आहे. सध्या कपिलधार गावातील रस्त्यांना जवळपास एक ते चार फूट अंतराच्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. चार दिवसांपासून या गावातील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत. इथं भूस्खलनाचा असणारा धोका पाहचा प्रशासनाने कपिलधारकडे जाण्याचा रस्ता तूर्तास बंद केला आहे, त्यामुळं आता नवं संकट ओढावण्याआधी येथील नागरिकांच्या दृष्टीनं प्रशासन पुढं कोणती कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
FAQ
कपिलधारवाडी गावात भूस्खलनाचा धोका कसा निर्माण झाला?
मागील दोन आठवड्यांपासून मराठवाडा भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील कपिलधारवाडी गावात डोंगर खचण्याची भीती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे गावातील जमिनी, घरे आणि रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या असून, हे माळीण दुर्घटनेसारखे संकट ओढवू शकते.
गावातील सद्यस्थिती काय आहे?
गावातील 5 ते 6 घरांना मोठे तडे गेले आहेत, तर रस्त्यांना 1 ते 4 फूट अंतराच्या भेगा पडल्या आहेत. शाळा आणि इतर इमारतींनाही नुकसान झाले असून, काही ठिकाणी डोंगर कोसळण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थांची मागणी काय आहे?
ग्रामस्थांनी परिस्थितीच्या गांभीर्यामुळे गाव सोडून स्थलांतरित होण्याची आणि पुनर्वसनाची मागणी केली आहे. ते माळीणसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीची मदत अपेक्षित आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.