
मराठमोळा रील स्टार तथा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचे निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यासह सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रथमेश गत काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्या मित्राने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या निधनाची दुःखद बातमी सार्वजनिक केली. प्रथमेश कदम व त्याची आई प्रज्ञा कदम यांचे रील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. प्रथमेश कदमचा जवळचा मित्र तथा सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरने त्याच्या निधनाची पुष्टी केली आहे. ‘तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे, खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई’, अशा शब्दांत तन्मयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तन्मयने प्रथमेशसोबतचा एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. तन्मयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत श्रद्धांजली वाहिली आहे. प्रथमेश कदमच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्याने ही जबाबदारी सांभाळलीच, शिवाय या दुःखावर मात करत आपल्या आईलाही धीर दिला. गत अनेक वर्षांपासून तो आपल्या आईसोबत सोशल मीडियावर रील करत होता. त्यांचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत होते. एवढेच नव्हे तर मराठी कलाकारांनीही या माय-लेकाच्या व्हिडिओला दाद दिली होती. त्यामुळे त्याच्या निधनामुळे सर्वच स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रथमेशने गत महिन्यात एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. तसेच आपल्या आजारपणावरही भाष्य केले होते. त्यानंतर तो रुग्णालयात भरती झाला होता. तिथेही त्याने अनेक मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत लोकांचे मनोरंजन केले होते. नवीन वर्षात त्याचे एक गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तोच त्याचा अखेरचा व्हिडिओ ठरला. प्रथमेशच्या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्स करून त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



