
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांनी मोठा गौप्सस्फोट केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मागील चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती असा दावा शरद पवारांनी केलाय, कारण मागील अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सातत्यानं हालचाली सुरू होत्या. नगरपरिषदेत काही ठिकाणी तर महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर म्हणजे 12 फेब्रुवारीला अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा करणार होते असंही यावेळी शरद पवारांनी म्हटल आहे.
दोन्ही राष्ट्रवादीत एकत्र येण्याबाबत एकमत होतं, अनेकदा त्याबाबत बैठकाही झाल्यात. 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता, तारीख दादांनी ठरवली होती. पण दुर्दैवाने अजित पवारांचा अपघात झाला असं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मागील काही दिवसांपासन चर्चा सुरू होती. जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये 4 महिन्यांपासून बोलणी सुरू होती, मात्र अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चेत खंड पडल्याचंही शरद पवारांनी म्हटले, तर दुसरीकडे जयंत पाटलांनी देखील शरद पवार यांच्या विधानाला दुजोरा दिला.
अपघातानंतर विलिनीकरणाच्या चर्चेत खंड
एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक दिसत आहेत. तर, दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र यावर बोलणं टाळत आहेत. राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबद्दल अजितदादांनी मत मांडलं नव्हतं असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. अजित पवारांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा खुद्द पवारांसह अनेक नेत्यांनी केला, दरम्यान यानंतर अजितदादांसोबत झालेल्या बैठकीचा जुना व्हिडिओ देखील समोर आलाय, मात्र या बैठकीचा व्हिडिओ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भातला असल्याचं तटकरेंनी म्हटल आहे. ती बैठक बारामती कृषी प्रदर्शनाच्या वेळेची असल्याचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा झाली असेही तटकरे म्हणाले.
पालिका निवडणुकीत एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ते भाजपसोबत जाणार की विरोधात बसणार हा देखील एक प्रश्न होता. मात्र, त्यावरही शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. भाजपसोबत जाण्याचा संबंध काय? असा सवाल त्यांनी केला. अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी दाट शक्यता होती. पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सूत्र शरद पवारांकडे जाणार अशी देखील चर्चा होती, मात्र, अजित पवारांच्या निधनाच्या दोन दिवसानंतर डाव उलटला सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, दरम्यान राष्ट्रवादीची सूत्र देखील त्यांच्याच हातात जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विलिनीकरणावर तूर्तास तरी पूर्णविराम लागला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



