
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातसोबत व्हिडिओ तसेच अनेक फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. पुढे त्यांनी सांगितले की, हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. तसेच आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे ट्विट चाकणकर यांनी केले आहे. सोबतच त्यांच्या राजीनाम्याचा फोटोही शेअर केला आहे. रुपाली चाकणकरांचीही चौकशी होण्याची शक्यता भोंदूबाबा अशोक खरातच्या ‘शिवनिका’ ट्रस्टमध्ये संचालिका म्हणून कार्यरत असल्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कडक भूमिका घेत, खरातशी संबंधित असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही आणि या ट्रस्टच्या सर्व संचालकांची सखोल चौकशी केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आता चाकणकर यांचीही चौकशी होण्याची चिन्हे असून, खरातच्या गैरकृत्यांशी किंवा आर्थिक व्यवहारांशी या ट्रस्टचा काही संबंध आहे का, हे शोधण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर उभे राहिले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



