
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. या चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त केल्याचेही सांगितले. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. तसेच, अजितदादांना न्याय द्या, असा संदेश काँग्रेसकडून देण्यात आल्याचेही समजते. या भेटीत रोहित पवार यांचा काँग्रेसचे प्रभारी नेते चेन्नीथला यांच्यासोबतही संवाद झाला, ज्यामुळे या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस जवळ आला असून, काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामतीत सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. सुरुवातीला वैध ठरलेल्या 53 अर्जांपैकी आता 47 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. मात्र अंतिम आकडेवारी सायंकाळनंतर स्पष्ट होणार असून, शेवटच्या दिवशी आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने आतापासूनच प्रचाराची तयारी सुरू केली असून, बारामतीत थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुरी पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 18 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या मतदारसंघात भाजप-महायुतीचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसत आहे. राहुरीत शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असून, तसेच ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारीबाबतही उत्सुकता आहे. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांत मोठे राजकीय निर्णय आणि अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता या शेवटच्या टप्प्याकडे लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.





