
Ambernath Gas Leak: ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचं औद्योगिक केंद्र असलेल्या अंबरनाथमध्ये गॅस गळती झाली आहे. येथील मोरीवली एमआयडीसीतून मंगळवारी रात्री पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गॅस उत्सर्जन झालं. यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात प्रचंड धूर पसरला. अगदी अंबरनाथमधून जाणाऱ्या रेल्वे रुळांच्या आजूबाजूच्या परिसरातही कारखान्यातून निघालेला पसरल्याने दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळालं. या गॅस उत्सर्जनामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं घडलं काय?
मोरीवली एमआयडीसीतून यापूर्वी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात गॅस उत्सर्जन करण्यात आलं होतं. यानंतर सोमवारी पुन्हा एकदा गॅस उत्सर्जन करण्यात आलं. मात्र मंगळवारी सोडण्यात आलेल्या गॅसने आधीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं. या गॅसला अॅसिड सदृश्य उग्र दर्प येत होता. त्यामुळे अॅसिडशी संबंधित प्रक्रिया करणाऱ्या एखाद्या कंपनीने स्क्रबर न वापरता गॅस थेट हवेत सोडल्याची शक्यता आहे.
श्वास घेणंही कठीण झालं
या गॅस उत्सर्जनानंतर निसर्ग ग्रीन, मोरीवली पाडा, ग्रीन सिटी, बी केबिन, पाठारे पार्क, मोतीराम पार्क, बुवापाडा, लादीनाका यासह संपूर्ण अंबरनाथ शहरात अक्षरशः श्वास घेणंही कठीण झालं होतं. मोरीवली एमआयडीसीतील कारखानदारांचे प्रतिनिधी अशोक वाळुंज यांनी या प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन एमपीसीबी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष
मोरीवली एमआयडीसीत 4 ते 5 कंपन्या स्क्रबर वापरत नसून त्यांच्याकडूनच सातत्याने अशाप्रकारे गॅस उत्सर्जन करून अंबरनाथकरांचा जीव धोक्यात टाकला जातोय. मात्र सातत्याने घडणाऱ्या या घटनांकडे एमपीसीबीचे अधिकारी सपशेल दुर्लक्ष करत असून अंबरनाथकरांचा जीव गेल्यावरच एमपीसीबीला जाग येणार का? असा संतप्त सवाल सध्या विचारला जातोय.
स्क्रबर म्हणजे काय?
‘कारखाना स्क्रबर’ हा शब्द मुख्यतः कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वच्छता उपकरणे किंवा उत्पादनांशी संबंधित आहे. औद्योगिक वायू स्क्रबर्स कारखान्यांमध्ये वापरले जातात. कारखान्यांमधून निघणारा धूर आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हे स्क्रबर्स वापरले जातात. हे वेट स्क्रबर प्रकारचे असतात ज्यामध्ये पाणी किंवा रसायने वापरून हानिकारक कण शोषले जातात. मात्र हे स्क्रबर्स न वापरल्यास कारखान्यात तयार होणारा वायू तसाच बाहेर फेकला जातो. जो आजूबाजूच्या परिसरात पसरल्यात तेथील लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. सामान्यपणे श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळणे, उलट्या, डोकेदुखी, डोळे चुरचुरने, डोळ्यांमधून पाणी येणे अशा समस्या दिसून येतात. मात्र वायू घातक असेल तर त्याचे अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.