
नवजात बालकांच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ-बदलापुरमध्ये उघडकीस आला आहे. अंबरनाथमधील २४ वर्षीय कलिंगड विक्रेता कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. हा संपूर्ण प्रकार कचरा टाकण्यावरुन हटकल्यामुळे समोर आलं आहे. यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत या कलिंगड विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथ पश्चिमेच्या फॉरेस्ट नाका परिसरात कलिंगड विकणाऱ्या एका तरुणाला कचरा टाकण्यावरून फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटकलं. यानंतर तो कलिंगड विक्रेता कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्याचा व्हिडिओ चित्रित केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी या तरुणाला वनविभागाच्या कार्यालयात बोलावून त्याने हा व्हिडिओ कुठे कुठे फॉरवर्ड केला आहे, हे पाहण्यासाठी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात लहान बाळांच्या खरेदी-विक्री संदर्भात केलेली चॅटिंग वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांना आढळून आली.
त्यानुसार त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलिंगड विक्रेता तरुण तुषार साळवे याच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपी तुषार साळवे याला २०२३ मध्ये देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात जामीन झाल्यानंतर पुन्हा त्याने तोच धंदा सुरू केला होता. मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांच्याकडून सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.