
बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी पवार कुटुंबाच्या एकजुटीबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; मात्र एक परिवार म्हणून मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब दिसते, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदासह अजितदादांकडील सर्व खाती मिळावीत, ही त्यांची इच्छा होती आणि आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. रोहित पवारांनी सांगितले की, अजितदादांचे स्वप्न हे पवार कुटुंब एकत्र राहावे, असेच होते. या दिशेने दादांकडून प्रयत्न सुरू होते. सुप्रिया ताई, पवार साहेब आणि आम्ही सर्वजणही तसाच प्रयत्न करत होतो, असे त्यांनी नमूद केले. दुर्दैवी घटनेनंतर गेल्या 13 दिवसांत कुटुंब एकत्र असल्याचेही त्यांनी सांगितले. कुठलाही पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र मतदानासाठी आले, हे त्या एकजुटीचे उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पवार साहेबांनी (शरद पवार) अलीकडेच जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मार्गदर्शन केल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. हे मार्गदर्शन भावनिक स्वरूपाचे होते आणि अजितदादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी पुढील काळात करण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पवार साहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली की, ते आम्हाला बोलावून मार्गदर्शन करतात, असे ते म्हणाले. या संवादादरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर रोहित पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले. मात्र, त्यांनी दोन महत्त्वाच्या तारखा जाहीर करत सूचक संकेत दिले. 10 फेब्रुवारीला मी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील काही शंका मांडणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत काय ठरले होते, हे सविस्तर सांगणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. रोहित पवार यांनी पुढे स्पष्ट केले की, अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे कुटुंबीय कोणतेही राजकीय विचार करू शकत नव्हते. आमच्या मनात राजकारणाचा विचारच आला नाही. आता या धक्क्यातून सावरत आम्ही राजकीय दृष्टीने विचार करायला सुरुवात करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. पवार कुटुंबात आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. पवार कुटुंबाच्या एकजुटीचा संदेश 9 फेब्रुवारीनंतर या चर्चांना सुरुवात होईल, असे संकेत देत रोहित पवार यांनी पुढील घडामोडींविषयी उत्सुकता वाढवली. त्यांच्या विधानांमुळे सुनेत्रा पवार यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य घडामोडींविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. एकूणच, रोहित पवार यांच्या वक्तव्यांमधून पवार कुटुंबाच्या एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला. त्याचवेळी आगामी दिवसांत होणाऱ्या खुलास्यांमुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता 10 आणि 12 फेब्रुवारीला रोहित पवार नेमके काय मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



