
Pune Crime News : गुन्हेगारी कृत्यांमध्ये दर दिवशी भर पडत असतानाच आता पुण्याच्या हद्दीतून दोन भयंकर हत्यांचं वृत्त समोर आल्यानं यंत्रणाही हादरल्या आहेत. अनैतिक संबंध ही हत्येमागची मुख्य कारणं ठरल्याची प्राथमिक माहिती तपासातून पोलिसांच्या हाती लागली असून, हादरवणारा घटनाक्रमही समोर आला आहे.
सतीश वाघ हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती…
काही महिन्यांपूर्वी पुण्यात सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांना अटक करण्यात आली होती. याच घटनेची पुनरावृत्ती पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून झाली आहे. अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा डोक्यात फावडा घालून खून केला. रवींद्र काशिनाथ काळभोर असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या तीन तासात पत्नी शोभा रविंद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केली. मंगळवारी सकाळी रवींद्र काळभोर हे घराच्या बाहेरील पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडून आल्याचे दिसून आले. पत्नीची चौकशी केली असता रवींद्र हे अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने रवींद्र काळभोर यांचा कायमचा काटा काढल्याची बाब उघडकीस आली.
अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून 22 वर्षीय युवकाची हत्या
पुण्याच्याच हद्दीत आणखी एक खळबळजनक घटना घडली. जिथं, अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून 22 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. आरोपीने धारदार कोयत्याने युवकाच्या मानेवर वार करत त्याचा जीव घेतला. पुण्याच्या मावळ भागामध्ये या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. खून झालेल्या तरुणाचं नाव वैभव उमेश सातकर असून, खून केल्याचा आरोप अंकुश जयवंत सातकर याच्यावर ठेवण्यात आला.
मयत वैभव सातकर आणि आरोपी अंकुश सातकर हे दोघे शेजारी राहत होते. मयत वैभव सातकर याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी अंकुश सातकरने त्याच्यावर बैलाच्या गोठ्यात धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात वैभव गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.