
Ajit Pawar Plane Crash New CCTV: बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. ही दुर्घटना बुधवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ घडली. यामध्ये दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्सच्या VT-SSK नोंदणी असलेल्या ‘लिअरजेट 45’ विमानाचा समावेश होता. विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, विमान परिचारिका पिंकी माळी, मुख्य वैमानिक सुमित कपूर आणि सह-वैमानिक शंभवी पाठक असे 5 जण होते. यादरम्यान अजित पवारांचं विमान दुर्घटनाग्रस्त होतानाचा एक नवा सीसीटीव्ही समोर आला आहे.
या नव्या व्हिडीओत विमान दुर्घटनाग्रस्त होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये विमान लँड होत असताना कशाप्रकारे अचानक हवेत वळताना आणि त्यानंतर दुर्घटनाग्रस्त होताना दिसत आहे. विमान खाली कोसळल्यानंतर मोठा आगडोंब उठताना दिसत आहे.
Ajit Pawar Plan Crash | अजितदादांच्या विमानाचा अपघात,थरकाप उडवणारा व्हिडिओ | Zee24Taas #ajitpawardeath #zee24taas #MarathiNewsTodayLive #Mumbaimayor #mahapalikaelection #PinkiMali #AjitPawar #AjitPawarPlaneCrash #FlightAttendantTragedy #MaharashtraNews #BaramatiPlaneCrash… pic.twitter.com/YhXYT4R326
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 28, 2026
चौकातील सीसीटीव्हीतही कैद झालीये दुर्घटना
चौकात लावलेल्या एका सीसीटीव्हीत ही दुर्घटना कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. विमान कोसळल्यानंतर आगडोंब उडाल्याचा दिसत आहे. यावरुन दुर्घटना किती भीषण होती हे स्पष्ट होत आहे.
अजित पवार कुठे निघाले होते?
माहितीनुसार, विमान सकाळी 8.10 वाजता मुंबईहून निघाले आणि सकाळी 8.45 च्या सुमारास रडारवरून नाहीसे झाले. सकाळी 8.46 ला ते कोसळले. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात चार सभांना संबोधित करण्यासाठी अजित पवार निघाले होते.
विमानाचे लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्यानंतर आपत्कालीन सेवा आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. बचाव पथकांना त्वरित पाचारण करण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यासाठी विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) चे एक पथक बुधवारी दिल्लीहून पुण्याकडे रवाना झाले.
नेमकं काय झालं?
व्हीएसआर कंपनीचं खासगी विमान लँडिंग करत असतानाच तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर ते हवेत गोल फिरलं. यानंतर विमान जमिनीवर आदळून त्याचे तुकडे झाले आणि मोठी दुर्घटना घडली ज्यामध्ये अजित पवारांसह सह जणांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, खाली पडल्यानंतर तीन ते चार स्फोट झाले ज्यामुळे मोठी आग लागली. आग मोठी असल्याने कोणी मदतही करु शकलं नाही.
“विमान खाली येत असताना आम्हाला ते लँड होईल असं वाटत होतं. पण ते दुर्घटनाग्रस्त झालं. खाली पडल्यानंतर जबरदस्त स्फोट झाला. त्यानंतर विमानाला आग लागली. आग लागल्यानंतर चार ते पाच स्फोट झाले. अनेक लोक आले आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आग मोठी असल्याने कोणीही मदत करु शकलं नाही. त्यात अजित पवार होते ही आमच्यासाठी फार दु:खाची बाब आहे,” असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
“विमान वरुन गेलं तेव्हा ठीक होतं. आम्ही गुरांना चार देत असल्याने घराबाहेर होते. तेव्हा 8.45 झाले होते. त्यानंतर काही वेळात ते दुर्घटनाग्रस्त झालं. स्फोट इतका मोठा होता की आमच्या घऱापर्यंत आलं. ते विमान फिरलं आणि खाली पडलं. ते धावपट्टीपर्यंत गेलंच नाही. आम्ही फार घाबरलो होतो. पोलीस आल्यानंतर आम्ही तिथे गेलो. आम्ही घरुन पाणी आणून त्यांना दिलं. तिथे मृतदेह पडले होते. आम्ही ते झाकण्यासाठी ब्लँकेट दिले. काही वेळाने ते मृतदेह नेण्यात आले,” असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. यावेळी एका महिलेने चाक आमच्या घरापर्यंत आलं होतं अशी माहिती दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



