
Malegaon Politics: भाजपात प्रवेश करण्यापूर्वी अपूर्व हिरे यांच्यावर मालेगावात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान यावरून अपूर्व हिरे यांनी नाव न घेता दादा भुसेंवर निशाणा साधलाय. राजकीय सुडापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप अपूर्व हिरे यांनी केलाय. तर हिरेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजनांनी एक सूचक विधान केलंय.
उत्तर महाराष्ट्रातील हिरे घराण्यातील माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अपूर्व हिरेंनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. दरम्यान या प्रवेशानंतर आता नाशिक जिल्ह्यात महायुतीमधील नेत्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. कालच मालेगावमध्ये अपूर्व हिरेंसह त्यांच्या कुटुंबावर मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान राजकीय सुडापोटी गुन्हा दाखल करण्यात आलाय.यामागे मालेगावमधील काही राजकीय शक्ती असल्याचा आरोप हिरेंनी केलाय. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा सुरू झालीये.
कोणत्याही पदाची आशा न बाळगता भाजपमध्ये प्रवेश केल्याचं हिरेंनी म्हटलंय.तसंच आगामी महानगरपालिकेत जोमानं काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. महापालिकेच्या संपूर्ण 48 जागा जिंकणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
अपूर्व हिरेंच्या भाजप प्रवेशानंतर गिरीश महाजन यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील काही नेते संपर्कात असल्याचा दावा देखील गिरीश महाजन यांनी केलाय. लवकरच संपर्कात असलेल्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय.
अपूर्व हिरेंनी दादांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केलाय. मालेगावात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून हिरेंनी नाव न घेता दादा भुसेंवर आरोप केलाय. त्यामुळे आगामी काळात दोन्ही नेत्यांमधला संघर्ष आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.
कोकणात आमचीच ताकद, शिवसेनेचा दावा तर भाजपाचीही स्वबळाची भाषा
लोकसभा, विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आता प्रत्येक पक्ष जिवाचं रान करू लागलाय. महायुती आणि महाविकास आघाडी जरी असली तरी जागावाटपाच्या सूत्रावर सर्व गणित अवलंबून असेल. असं असताना त्या आधीच तळकोकणात महायुतीत धुमशान सुरू झालं आहे. आमचा पक्ष मोठा म्हणत शिवसेनेनं भाजपला ललकारलंय तर त्यावर भाजपानंही स्वबळाची भाषा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. गावागावांत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं कंबर कसली आहे. बैठका, मेळावे सुरू झालेत. या सगळ्यात लक्ष वेधलं जातं आहे ते तळकोकणाकडे. कारण इथे सध्या महायुतीत धुमशान सुरू झालं आहे. अद्याप निवडणुका युती म्हणून लढणार की स्वबळावर हे स्पष्ट झालेलं नाही. जागावाटपालाही अवकाश आहे पण त्याआधीच स्थानिक पातळीवर मात्र जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मेळाव्यात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी सावंतवाडी आणि कुडाळ मतदारसंघात 60 टक्के जागा मिळाव्यात अशी मागणी केली. हीच री ओढत मंत्री उदय सामंत यांनी संघटना इतक्या जोमानं वाढवा की आपल्याला 80 टक्के जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर निवडणुका युती म्हणूनच लढल्या जातील. मात्र, युती धर्म दोन्हीकडून पाळला जावा असं सांगत आमदार दीपक केसरकर यांनी भाजपाला कोपरखळी मारली आहे. तर कोकणात शिवसेना हाच मोठा पक्ष असं जाहीर करुन मंत्री भरत गोगावले यांनी दंड धोपटले आहेत.
भाजपाचीही स्वबळाची भाषा
शिवसेनेच्या नेत्यांच्या या दाव्यावर भाजपाकडून उत्तर मिळालं नाही तरच नवल. निवडणुकीत दोन्ही आमदार निवडून येण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांची फळी कार्यरत होती असं म्हणत भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी सुनावलं आहे. महायुती म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गळ्यात गळे घालून काम करणारे युतीचे कार्यकर्ते आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात स्वतःच्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात म्हणून नेत्यांकडे मागणी करत आहेत. नेते मंडळीही कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या हो ला हो देत आहेत. वरीष्ठ नेत्यांनी महायुती म्हणून लढणार असल्याचं जाहीर केलंय खरं. पण आगामी काळात नेमकं काय घडतं यासाठी थोडी कळ सोसावी लागेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.