
स्थानिक दस्तुरनगर प्रभागातील चिमोटे ले आऊटमधील रहिवाशांचे आरोग्य महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आले आहे. लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या भुयारी गटार योजनेचा फज्जा उडाला असून गटार पूर्णतः भरून त्यातील सांडपाणी घरात शिरणे सुरू झाले आहे.
.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारीचा स्वरही उमटवला. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात टोलवाटोलवी सुरु आहे. एक यंत्रणा दुसऱ्या यंत्रणेकडे तर दुसरी यंत्रणा पहिल्या यंत्रणेकडे बोट दाखविते. त्यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली असून हा त्रास त्वरेने दूर करावा, अशी मागणी पुढे आली आहे. ऐन पावसाळयाच्या तोंडावर हा प्रकार घडला. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखीच भर पडली असून रोज सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे.
भुयारी गटारचे चेंबर गेल्या तीन महिन्यांपासून कमी-अधिक प्रमाणात ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाला साकडे घातले. परंतु अद्यापही या अडचणीचा कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही. चिमोटे ले आऊटमध्ये खेरडे यांच्या घरासमोरील भुयारी गटार योजनेचे मॅनहोलमधून तीन महिन्यापूर्वी सांडपाणी बाहेर पडू लागले. सुरुवातीला वेग कमी होता. परंतू काही दिवसातच पाण्याचा प्रवाह वाढला आणि घराशेजारी सांडपाण्याचे तळे साचले. महानगरपालिकेत तक्रार दाखल केल्यावर महिन्याभराने जागे झालेले प्रशासन दाराशी आले. त्यानंतर बांबल यांचे घरासमोर खड्डा खणून चेंबरचे झाकण उघडले गेले. परंतू समस्या निकाली निघाली नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे हा खणलेला खड्डा बुजवण्याचीदेखील तसदी मनपाने घेतली नाही. दोन दिवसात झालेल्या पावसाने हा खड्डा पाण्याने तुडूंब भरला असून भर पावसात येणारे दुचाकीस्वार त्यात घसरले तर मोठा अपघात होऊ शकतो. हे कमी काय तर गुणवंत लॉन कडून चिमोटे ले आऊट कडे येणाऱ्या रस्त्यावरदेखील भुयारी गटार योजनेचे एक चेंबर पूर्णत: ओव्हरफ्लो झाले असून सांडपाणी २४ तास रस्त्यावर वाहते आहे . तीन वर्षापूर्वी अशीच समस्या उद्भवली होती त्यावेळी मनपाने तातडीने दखल घेऊन यंत्रणा कामी लावली होती आता मात्र तीन महिन्यापासून पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही योजना नागरिकांच्या जीवावर उठली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.