
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकावरील आशा सोडलेल्या असतानाच, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील तज्ज्ञ चमूने आज, शनिवारी बाधित भागाची
.
यावेळी अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ. योगेश इंगळे (वनस्पती रोगशास्त्रतज्ज्ञ), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत संत्रा संशोधन केंद्र अचलपुर येथील शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र वानखडे (उद्यानविद्या विभाग), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील संशोधन सहयोगी कौस्तुभ देशपांडे, तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने व सहाय्यक कृषी अधिकारी राहुल पांडे यांची उपस्थिती होती. सदर संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी संत्रा उत्पादकांना योग्य ते मार्गदर्शनही केले.
संत्रा बागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुळकुज, पाने गळणे, झाडे वाळणे तसेच पडलेल्या फळांचे मोठे प्रमाण याची तज्ज्ञांनी नोंद घेतली. दरम्यान सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादकांना थेट ४० टक्के आर्थिक फटका बसला आहे, असा प्राथमिक अंदाजही नोंदविला. कृषी विद्यापीठाच्या संत्रा संशोधन केंद्राचे तज्ज्ञ म्हणाले की, अतिपावसामुळे जमिनीतील ऑक्सिजन कमी झाला आहे, मुळे कुजत आहेत. यावर तातडीने पाणी काढणे, औषधांची फवारणी व सेंद्रिय द्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. पावसामुळे झालेल्या या नुकसानाने संत्रा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले असून त्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करुन आर्थिक मदत पुरविण्याची मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे संत्रा पट्टा पुन्हा एकदा संकटात आला असून, या परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी तातडीची मदत जाहीर करणे आवश्यक आहे. मे महिन्यात पाऊस असल्यामुळे मृग बहार फुटलाच नाही. त्यामुळे नैसर्गिक संकट समजून पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सर्वेक्षणाचे वेळी सुरज अवचार, संजय सुने, अश्विन खुरपडे, राहुल भोजने, रमेश सुने, अरविंद पोटे, संजय मोहकर, पंकज गुजर, मोहन गुजर, प्रमोद भोपळे, राजेंद्र लोचन व इतर शेतकरी उपस्थित होते.
…तर आंदोलन करणार
दरवर्षी वेगवेगळ्या संकटांनी संत्रा पिकावर गदा येते. सरकारने भरपाई न दिल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा संत्रा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. तज्ज्ञांच्या पाहणी दौऱ्यादरम्यानच त्यांनी ही भूमिका मांडली.
अतिवृष्टीमुळे शेतातील विहिरी खचल्या
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पापळ, वाढोणा (रामनाथ) येथे गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, सिमेंट काँक्रीटने बांधलेल्या शेतातील विहिरीसुद्धा खचल्या आहेत.
सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये दलदल निर्माण होऊन पापळ येथील शेतकरी उमेश बलखंडे, वाढोणा रामनाथ येथील शेतकरी नंदकिशोर प्रल्हाद माटोडे आणि शेतकरी राजेंद्र उत्तमराव माटोडे यांच्या शेतातील विहीरींचा वरचा भाग खचला असून तीनही शेतकऱ्यांचे मोटर पंप गाळात फसले आहेत. हे शेतकरी अल्पभूधारक असून अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान प्रत्येकी दीड लाखाचे असून शासनाने त्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पुढेआली आहे. दरम्यान विवंचनेत असलेल्या या शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार यांच्याकडे नुकसान भरपाईचा अर्ज केला असून पंचनाम्याची मागणी केली आहे. सदर घटनेचा पंचनामा महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्त रित्या करावा अशी गावकऱ्यांची मागणी असून झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांना त्वरित मदत व्हावी असेही त्यांचे म्हणणे आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.