
अमरावती येथे केंद्र सरकारच्या ‘चार लेबर कोड’ धोरणाविरोधात कामगार आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनामुळे इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतची वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलकांनी सुमारे दोन तास जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या दिल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, ज्यामुळे पोलिसांना हा मार्ग एकदिशा करावा लागला. या संपामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्या पूर्णपणे बंद राहिल्या. शाळांमधील मध्यान्ह भोजन योजना आणि आशा वर्कर्सच्या सेवाही ठप्प झाल्या. बँका, एलआयसी, टपाल कार्यालये, महावितरण, दवाखाने, औषधालये आणि विविध शासकीय कार्यालयांमधील कामकाजही प्रभावित झाले. केवळ कंत्राटी कर्मचारी कामावर उपस्थित होते, त्यांच्यामार्फत कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास सर्व आंदोलक इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. त्यानंतर त्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आयटक आणि सीटूच्या नेतृत्वाखालील अंगणवाडी सेविका व मदतनीस, शालेय पोषण आहार योजनेचे कर्मचारी, आशा वर्कर्स, महाराष्ट्र सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, किसान सभा, शेतमजूर युनियन, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तसेच विद्यार्थी व युवक संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते. समितीचे निमंत्रक डी. एस. पवार, सीटूचे अध्यक्ष सुभाष पांडे, आयटकचे कोषाध्यक्ष चंद्रकांत बानुबाकोडे, वर्कर्स फेडरेशनचे महेश जाधव, भाकपचे जिल्हा सरचिटणीस सुनील मेटकर, शेतमजूर युनियनचे चंद्रकांत वडस्कर आणि ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे निळकंठ ढोके यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या जाहीर सभेने झाला, जी सुमारे दोन तास चालली. यावेळी प्रमुख नेत्यांसह बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे पंकज गावंडे, संयुक्त किसान मोर्चाचे अशोक सोनारकर, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनचे सुनील देशमुख, दीपक विधळे, एलआयसी एम्प्लॉईज असोसिएशनचे विजय भुयार, देवीदास राऊत, महादेव गारपवार, प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, जे. एम. कोठारी आणि सुनील घटाळे यांनीही आपली भूमिका मांडली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



