
जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्याने अमरावती येथील जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातर्फे “टीबी मुक्त भारत अभियान फेज २” चे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे, जिल्हा क्षय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड उपस्थित होते. भारत सरकारच्या ‘टीबी मुक्त भारत’ या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीसाठी या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या अभियानाचे प्रमुख उद्देश्य क्षयरोगाचे लवकर निदान करणे, सर्व रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार पुरवणे, औषधोपचार पूर्ण करण्यावर भर देणे, क्षय रुग्णांचे विशेष व्यवस्थापन करणे, संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे आणि टीबी प्रतिबंधात्मक उपचार वाढवणे हे आहे. यासाठी घराघरात जाऊन टीबी स्क्रीनिंग व सर्वेक्षण तसेच जलद तपासणी केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. कुपोषित रुग्णांसाठी पोषण सहाय्य, निक्षय मित्र उपक्रमाद्वारे सामाजिक सहभाग, उच्च जोखमीच्या गटांमध्ये (एचआयव्ही, मधुमेह, कुपोषण) विशेष लक्ष आणि खाजगी वैद्यकीय क्षेत्राचा सक्रिय सहभाग हे या अभियानचे प्रमुख उपक्रम असतील. यावेळी बोलताना सीईओ संजिता महापात्र यांनी सांगितले की, टीबी निर्मूलनासाठी केवळ आरोग्य विभाग नव्हे, तर संपूर्ण समाजाने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. ‘टीबी हरेल देश जिंकेल’ या घोषवाक्याखाली सर्वांनी एकत्र येऊन टीबीमुक्त भारत घडविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. डॉ. रुपाली कोरडे व डॉ. संदीप सुखसोहळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल धांडे यांनी केले, तर आभार पुरुषोत्तम खडसे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गो. ग. राठी शासकीय क्षयरोग रुग्णालय आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



