
अमरावतीमध्ये शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी आमदार सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रस्तावित शैक्षणिक संकुलाला डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचे नाव दिले जाणार आहे. या संकुलासाठी आवश्यक निधीची घोषणा ६ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आमदार खोडके यांनी व्यक्त केली आहे. आमदार खोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे. त्यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, ६ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या संकुलाची घोषणा करण्याची विनंती केली आहे. यामुळे शहरातील शैक्षणिक वर्तुळात प्रशासकीय सुलभता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. अमरावती हे विभागीय मुख्यालय आणि विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. येथे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यासह अनेक शिक्षण विभागाची कार्यालये आहेत. ही कार्यालये सध्या शहराच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेली आहेत, ज्यामुळे त्यांच्यात समन्वय साधण्यात अडचणी येतात. नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत (शैक्षणिक संकुल) उभारून ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणल्यास विभागाच्या पाचही जिल्ह्यांतून येणारे विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, संस्थाचालक आणि कर्मचारी यांना सोयीचे होईल. यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचेल, तसेच प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी होईल. हे शैक्षणिक संकुल टोपे नगरातील ‘डायट’ कार्यालयाच्या बाजूला उभारण्याचा प्रस्ताव आहे. या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असून, जवळच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचेही कार्यालय आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर एका शैक्षणिक संकुलात रूपांतरित केला जाऊ शकतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



