
अमरावती जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा कहर कायम होता. काही तासांच्या या पावसामुळे २ हजार २३४ हेक्टरमधील शेती पिके खराब झाली. वीज पडून व पुरात वाहून गेल्याने जिल्ह्यात ६ गुरांचा जीव गेला. एकूण ८९ घरांची पडझड झाली. तिवसा महसूल मंडळात अतिवृष्टीची नों
.
तिवसा तालुक्यातील वणी-सुल्तानपुर या मार्गावरील मुख्य रहदारीचा पुल पुराच्या प्रवाहाने अक्षरशः खचला. त्यामुळे अनेक गावांच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. गेल्या ३० वर्षांपासून वणी-ममदापूर, सुल्तानपुर, नमस्कारी आदी गावांच्या वाहतुकीसाठी हा पूल वापरला जात होता. जिल्हा परिषदेने बांधलेल्या या पुलाखालून अनेकदा पुराचे पाणी वाहून गेले. परंतु शनिवारी मुसळधार पावसामुळे पुलावरुन पाणी वाहत गेले. पाण्याचा वेग फार होता. त्यामुळे सदर पूल खचला असून आता या पुलावरून रहदारी झाल्यास जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही शनिवारी मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे गोळेगाव, जगतपूर या गावांच्या मधोमध वाहणाऱ्या साखळी नदीला पूर आला. परिणामी दोन्ही गावांचा संपर्क तुटला. काठावर सुमारे ५० नागरिक अडकले होते. त्यांना बराच काळ तेथेच थांबावे लागले. दोन गावांना जोडणारा पूल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही पूल पूर्ण झाला नाही. मागील वर्षी पुलाकरिता खड्डे खोदून ठेवण्यात आले. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले. साचलेल्या पाण्यात पडून एका लहान मुलांचा मृत्यूही झाला. तरीही पुलाच्या कामाने वेग घेतला नाही.
दर्यापूर तालुक्यातील १ हजार ४८८ शेतकऱ्यांना फटका बसला. अंदाजे १५५८.६० हेक्टर जमिनीतील शेती पिकांचे नुकसान झाले. नऊ गावांमध्ये २३ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. यारम्यान बाधीत घरांचे व शेती पिकांचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सासन-रामापूरमध्ये दरवर्षी गावाच्या बाहेरील शेताचे व तलावाचे पाणी शिरते. त्यामुळे कित्येक घरांचे नुकसान होते. दरम्यान गतवर्षी पाहणी करताना अधिकारी यांनी पुढील वर्षी गावात पाणी शिरणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर जनतेच्या समस्यांकडे पाठ फिरवली, असा गंभीर आरोप युवासेना तालुकाप्रमुख सागर गिऱ्हे व संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी केला आहे.
संत्रा बागायतदारांसमोर नवे संकट
अमरावतीतील संत्रा उत्पादकांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. वातावरणातील बदलांमुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. आंबिया बहरातील फळांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. ‘थ्रीप्स’ या शत्रू किडीमुळे संत्र्यासह सर्व फळपिकांचे नुकसान होत आहे. कोळशीमुळे संत्रा फळांवर काळे-लालसर डाग पडत आहेत. फवारणी करूनही कोळशीचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. संत्र्याची झाडे वाळत असून, त्यांची पाने पिवळी पडत आहेत. झाडावरील फळेही पिवळी होत आहेत.
शेतकरी महागडी औषधे खरेदी करत असले तरी त्यांचा खर्च वाया जात आहे. फायटोप्थोरा बुरशीमुळे फळगळ वाढत आहे. फांदीमर आणि डायबॅकचा प्रश्नही निर्माण झाला आहे. रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने फळांना बाधा पोहोचत आहे.
तिवसा तालुक्यातील वडूरा, वागदा, कुऱ्हा भाग १-२, चेनुष्टा, रहिमाबाद, जहागिरपूर, मार्डा आणि बोर्डा परिसरातील शेतकऱ्यांना फळगळतीचा सामना करावा लागत आहे. वन्य प्राण्यांमुळेही फळांचे नुकसान होत आहे. खते, कीटकनाशके आणि तणनाशकांवरील जीएसटी, तसेच पेट्रोल-डिझेलवरील अतिरिक्त करामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. संत्रा संशोधन संस्था असूनही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.