
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा जोर वाढत असतानाच मतदार यादीतून अनेक गावे गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेण्याची अंतिम मुदत मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी संपली. मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि धा
.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही यादी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या याद्यांचे विभाजन करून तयार करण्यात आली आहे. मूळ विधानसभा यादीवरच अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतले असताना, तीच आधारभूत मानून यंत्रणेने हा नवीन घोळ निर्माण केल्याचा आरोप होत आहे.
यादीतून नावे गायब झाल्याने संबंधित गावांमध्ये मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी ठिकठिकाणी तहसीलदारांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचल्या असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्याच्या मतदार यादीत सर्वाधिक घोळ झाल्याचे दिसून आले आहे. या तालुक्यातील टाकरखेडा मोरे, अहमदपूर, धनेगाव, रौंदळपूर, पोही, रत्नापूर (पोही), जवळा बु., जवळा खुर्द, औरंगपूर, सैदापूर, डोंगरगाव (तुरखेड), मलकापूर बु., अडगाव खाडे, नवापूर, मासमापूर, मूर्तिजापूर, घोंगर्डा, हसनापूर, पार्डी, शिरजगाव, कारला, निमखेड आड, जवर्डी आणि धुळकी या गावातील नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीत.असाच प्रकार दर्यापूर तालुक्यातही घडला आहे. या तालुक्यात जिल्हा परिषदेचे येवदा, खल्लार, थिलोरी आणि पिंपळोद असे चार मतदारसंघ आहेत. या चारही मतदारसंघातील काही गावे मतदार यादीत दिसून आली नाहीत, अशी तेथील नागरिकांची तक्रार आहे.
मोर्शी तालुक्यातील हिवरखेड, पिंपळखुटा मोठा, अंबाडा, नेरपिंगळाई आणि रिद्धपूर तर वरुड तालुक्यातील पुसला, बेनोडा, जरुड, आमनेर आणि लोणी या पाच मतदारसंघातील काही गावे गायब झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातही अशीच स्थिती समोर आली आहे.दुसरीकडे, अमरावती आणि भातकुली तालुक्याच्या मतदार यादीतही काही त्रुटी आढळल्या आहेत. अमरावती तालुक्यातील काही गावांच्या रहिवाशांची नावे दुसऱ्या गावांत दर्शविली आहेत, तर भातकुली तालुक्यातील विवाहित महिलांची नावे अद्याप त्यांच्या माहेरच्या पत्त्यावर कायम असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे करण्यात आली आहे.
आता प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींवर सुनावणी घेऊन आगामी २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी घोषित केली जाणार आहे. ही यादी घोषित करताना संबंधित मतदारांची मतदान केंद्रे कोणती असतील, याची माहितीही जाहीर केली जाईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.