
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे निर्माण झालेल्या संकटानंतर आता वातावरणात बदल होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला असून शेतकरी अजूनही सावरलेला नाही. मात्र, बुधवारी म्हणजे 8 एप्रिलपासून हवामानात काहीसा बदल जाणवू लागला आहे. पावसाचा जोर ओसरत असला तरी संपूर्ण दिलासा मिळालेला नाही. भारतीय हवामान विभाग ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यात आज पावसाचा कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 ते 35 अंशांच्या दरम्यान राहू शकते. पुढील काही दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात हवामानात स्पष्ट बदल जाणवत आहेत. आर्द्रतेसह उष्णता वाढल्याने वातावरण दमट आणि त्रासदायक होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी सूर्याचा तडाखा तीव्र जाणवत असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेतच आवश्यक कामे उरकावीत, तसेच पाण्याचे प्रमाण वाढवून आरोग्याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव कायम आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्णतेचा धोका वाढत असल्याने सतर्क राहणे आवश्यक हवामान तज्ञांच्या मते, उत्तर भारतात सुरू असलेल्या या घडामोडी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये हवामान साफ होण्यास सुरुवात झाली असून, पुढील दोन दिवसांत इतर भागातही सुधारणा होईल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर बिहार, ओडिशा आणि तेलंगणाच्या काही भागांमध्येही हलक्या सरी पडू शकतात. एकंदरित, राज्यात अवकाळी संकट ओसरत असले तरी उष्णतेचा धोका वाढत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.





