
Maharashtra News : मानवाची सध्याची वाटचाल ही आधुनिकीकरणाच्या दिशेनं होत असतानाच गतकाळात डोकावून पाहिल्यास समोर येणारे काही संदर्भ हैराण करून सोडतात. मानवी उत्पत्तीनंतर कैक वर्षांनी विविध सभ्यतांचा उदय झाला आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. नैसर्गिक आपत्ती, मानवी हस्तक्षेप, संघर्ष अशा एक ना अनेक कारणांनी या सभ्यतांचा ऱ्हास होत गेला. भूगर्भात अगदी शांततेत दडलेल्या याच सभ्यता पुढे जाऊन इतिहासकार आणि पुरातत्त्व खात्याच्या निरीक्षणातून समोर येताच सारं जग भारावलं.
कैक हजार वर्षांपूर्वीच्या शहर रचना, शहरातील पाणी आणि सांडपाण्यासाठी केलेली सोय इथपासून त्या काळात वापरले जाणारे दागिने, भांडी आणि हत्यारंसुद्धा बऱ्याचदा उत्खनन मोहिमांमुळं समोर आली. आता असाच एक कमाल उलगडा महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात झाला असून, नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी त्यासंदर्भातील दावा केला आहे.
3000 वर्षांपूर्वीचे अवशेष
तब्बल 3000 वर्षांपूर्वीचे हे अवशेष असून, त्यांचा संबंध थेट लोहयुगाशी जोडण्यात येत आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वं विभागाच्या पथकानं 2023-24 दरम्यान बाभूळगाव तालुक्यात येणाऱ्या पाचखेड गावात उत्खनन मोहिम हाती घेतली होती. इथं 8.73 मीटर खोलीवर काही सांस्कृतिक ठेवी सापडल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. प्रभास साहू यांनी दिली.
निरीक्षकांच्या माहितीनुसार या ठेवींना चार कालखंडात विभागलं असता या अवशेषांवरून शोधाचा क्रम लोहयुगापासून सुरू झाला. पुढे सातवाहन, मध्ययुगीन आणि निजाम काळात सध्या सापडलेले अवशेष एका टेहळणीसाठीच्या बुरूजाचे अथवा वॉच टॉवरचे असल्याचं म्हटलं गेलं.
उत्खननातून सपडलेल्या अवशेषांमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश?
उत्खननातून सपडलेल्या अवशेषांमध्ये चुनखडकांच्या फरशा, लाकडी खांब, मातीची भांडी, लोखंडी वस्तू, दगडी मणी, हाडांच्या वस्तू आणि संपूर्ण घराच्या आराखड्याचा समावेश आहे. ज्यामुळं या अवशेषांची रचना आणि त्यांची ठेवण पाहता ते लोहयुगातील असू शकतात असा दावा साहू आणि इतर निरीक्षणकर्त्यांकडून केला जात आहे.
प्राथमिक स्वरुपातील ही माहिती समोर आल्यानंतर आता हे सर्व नमुने दिल्लीतील इंटर युनिव्हर्सिटी अॅक्सिलरेटर सेंटर इथं पाठवण्यात आले असून, तिथं त्यांचं एएमएस डेटिंग केलं जाणार आहे. ज्यानंतर त्यांचा नेमका कालखंड समोर येईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी मे- जून पर्यंतचा कालावधी लागू शकतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.