
Sharad Pawar Phone Call To CM Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे अनुभवाने आणि वयाने राज्यातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. त्यामुळेच शरद पवार त्यांच्यावर केलेली टीका फारशी गांभीर्याने घेत नाहीत. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण हाकेंनी केलेल्या टीकेवरुन शरद पवारांनी त्याच्याकडे लक्ष देऊ नका असं मोजक्या शब्दात उत्तर देत विषय टाळला. मात्र सामान्यपणे टीकेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शरद पवारांना एक टीका जिव्हारी लागली आहे. विशेष म्हणजे ही टीका त्यांच्यावर नाही तर त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या सहकाऱ्यावर करण्यात आली. शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करुन आपली नाराजी कळवल्याचं वृत्त आहे.
‘या’ आमदाराची केली तक्रार
शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सकाळी फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांनी कॉलदरम्यान भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराची तक्रार फडणवीसाकडे केली. पवारांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये आपला निषेध नोंदवला. पवारांनी ज्या आमदाराची तक्रार केली त्यांचं नाव आहे, गोपीचंद पडळकर! गुरुवारी पडळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान नेते तथा आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या अर्वाच्य शब्दातील टीकेवरुन नाराजी व्यक्त केली.
पडळकर काय म्हणाले होते?
सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का?” अशा अर्वाच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. गोपीचंद पडळकरांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
‘अरे जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे ती कार्यक्रम करायची. तुझ्यासारख्याची औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही,’ असं वादग्रस्त विधान पडखळकरांनी आपल्या भाषणादरम्यान केलं.
भाजप नेत्यांना ही भाषा मान्य आहे का ?
पडळकर सारख्या नीच, घाणेरड्या माणसाकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार..! pic.twitter.com/5Jrpldkt3t— Shubham Jatal (@ShubhamJatalNcp) September 18, 2025
शरद पवार फडणवीसांना फोनवर काय म्हणाले?
शरद पवारांनी फडणवीसांना केलेल्या फोन कॉलवर पळकरांच्या या टीकेबद्दल नाराजी व्यक्त करताना, “अशी गलिच्छ टीका करणं हे योग्य नाही,” असं म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. “या वक्तव्याचा निषेध आहे,” असंही पवारांनी फडणवीसांना सांगितलं. या कॉलच्या माध्यमातून शरद पवारांनी फडणवीसांनी या प्रकरणात योग्य ती समज पडळकरांना द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, असं सांगितलं जातंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.