
अशोक खरात भोंदुगिरीसोबतच काळा पैसा पांढरा करण्याचे धंदेही हवाला रॅकेटच्या माध्यमातून करत असल्याचा संशय आहे. त्याचे हवाला रॅकेट पार दुबईपर्यंत पोहोचले होते, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. हे रॅकेट चालवण्यासाठी अशोक खरातने मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेलमधली आलीशान रूम 25 हजार रुपये भाडे तत्त्वावर घेतली होती. इथूनच तो कोट्यवधी रुपयांची देवाण-घेवाण करत होता. यासंदर्भात एसआयटीने केलेल्या तपासात खरातच्या दोन मोबाइलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक आणि पुणे परिसरातील पाच जणांचा सहभाग असलेल्या एका मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. मुख्य संशयित अशोक खरात याच्या माध्यमातून जमिनी बळकावणे आणि एका बिल्डरचा तब्बल 300 कोटींचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून ‘आशीर्वादाच्या’ नावाखाली चालणाऱ्या या काळ्या पैशांच्या देवाणघेवाणीचे धक्कादायक पुरावे हाती लागले आहेत. तक्रारदाराच्या आरोपानुसार, देवदर्शनाच्या बहाण्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सहकारी पतसंस्थांमध्ये इतरांचे पॅन व आधार कार्ड वापरून बनावट खाती उघडण्यात आली असून, या संपूर्ण नेटवर्कच्या माध्यमातून जमिनीच्या व्यवहारांत मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांचा वापर झाल्याचा दाट संशय तपास पथकाने व्यक्त केला आहे. अशोक खरातच्या विरोधात आता आणखी एक नवा गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये समता पतसंस्थेच्या राहाता शाखेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे. 2021 मध्ये या पतसंस्थेत नियमबाह्य पद्धतीने तब्बल 100 खाती उघडण्यात आली होती, ज्यामधून आतापर्यंत 60 कोटी रुपयांहून अधिक रकमेची संशयास्पद देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी पोलिसांनी 19 खातेदारांची सखोल चौकशी सुरू केली असता, या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून खरातने बँकिंग यंत्रणेचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होत आहे. तपासाच्या ओघात अशोक खरातने अनेक निष्पाप लोकांना आपल्या जाळ्यात ओढून अमाप पैसा जमवल्याचे आणि मोठ्या प्रमाणात मालमत्ता गोळा केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि काळ्या पैशाचा वापर पाहता, आता ईडी देखील या घोटाळ्याचा तपास करण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, खरातशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असा कडक इशारा दिला आहे. कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारांच्या तपासात एक खळबळजनक माहिती समोर आली असून, तेथील 57 खातेदारांच्या 100 खात्यांवर ‘नॉमिनी’ म्हणून थेट अशोक खरात याचेच नाव नोंदवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व खात्यांशी खरातचाच मोबाईल नंबर जोडलेला असून आतापर्यंत या माध्यमातून सुमारे 60 कोटी रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. या खात्यांमध्ये खरात कुटुंबातील 8 खात्यांसह प्रतिभा चाकणकर व अन्य एका चाकणकर नावाच्या व्यक्तीच्या खात्यांचा समावेश असून, यातील ‘प्रतिभा’ हे नाव महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाशी साधर्म्य दर्शवणारे असल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




