
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे एकामागून एक उघडकीस येत असून, त्याने शंभरहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आणि त्याचे चित्रीकरण केल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणातील 100 हून अधिक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध झाल्या असून, केवळ शोषणच नव्हे तर धमकावून मोक्याच्या जमिनी बळकावल्याचेही आरोप त्याच्यावर होत आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हे व्हिडिओ नेमके बाहेर कसे आले, अशोक खरातला कशी अटक झाली, याबाबत सविस्तर माहिती दिली असून या गोरखधंद्यांचे धागेदोरे आता अधिक खोलात तपासले जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ऑफिस बॉयने कसे उघडकीस आणली व्हिडिओ? अशोक खरातचे काळे धंदे समोर येण्यामागे त्याच्याच ऑफिस बॉयने घेतलेला धाडसी पवित्रा कारणीभूत असल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे. खरातने ऑफिस बॉयच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर, संतापलेल्या ऑफिस बॉयने खरातच्या विरोधात जात त्याचे काही पुरावे रेकॉर्ड केले होते. आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्यास हे पुरावे समोर यावेत या उद्देशाने त्याने ते व्हिडिओ काही विश्वासू व्यक्तींकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर ज्यांच्याकडे हे व्हिडिओ होते त्यांनीही सुरक्षिततेसाठी ते पुढे इतरांकडे सोपवल्याने साखळी पद्धतीने हे सर्व व्हिडिओ आता सार्वजनिक झाले असून खरातचा खरा चेहरा समाजासमोर आला, अशी माहिती कर्णिक यांनी दिली आहे. पुढे बोलताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, आम्ही 65 ट्वीटर अकाऊंट तसेच काही फेसबूक व इन्स्टा अकाऊंटवर गुन्हे दाखल केले आहेत. काही व्हिडिओ मॉर्फ देखील केले आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचे कर्णिक म्हणाले. बऱ्याच ठिकाणाहून अशोक खरातकडे लोक येत होते. महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून देखील येत होते. अशोक खरातच्या सगळ्या व्हिडिओंची संख्या खूप मोठी असल्याची माहिती कर्णिक यांनी डली आहे. अशोक खरातला कशी अटक झाली? पोलिस आयुक्त कर्णिक यांनी पुढे सांगितले की, अशोक खरातला पकडण्याचे ऑपरेशन हे अत्यंत गोपनीय होते, कारण आरोपीचे शिष्य, भक्तगण हे सर्वच क्षेत्रात पसरलेले आहेत. त्यामुळे, जर हे ऑपरेशन लीक झाले असते तर आरोपी पळून जाण्याची किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला असता. आरोपीला कुठल्याही गोष्टी न समजू देता किंवा त्याला अलर्ट न होऊ देता त्याला अटक करणे महत्त्वाचे होते. पुढे बोलताना संदीप कर्णिक म्हणाले, त्यानंतर, महिला तक्रारदारास विश्वासात घेऊन तक्रार नोंद करुन घेणे गरजेचे असते. त्यामुळे, खरातच्या अटकेची प्रक्रिया किंवा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया ही पोलिस खात्यातल्या काहीच जणांना माहिती होती. तसेच, आधी महिलेची फिर्याद घेतली, त्यानंतर अशोक खरातच्या अटकेची कारवाई सुरू झाली. रात्री 11 वाजता आरोपी खरात घरी असल्याची खात्री केल्यानंतर अटक करण्याची कारवाई केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



