
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरातून समोर आलेल्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणावर आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. “हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे,” असे म्हणत मुनगंटीवार यांनी अशा भोंदू बाबांविरोधात एक दिवसासाठी कायदा बदलून त्यांना ‘सुया टोचून टोचून मारण्याची’ शिक्षा दिली पाहिजे, असे विधान केले आहे. स्वतःला अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर सिन्नरच्या मिरगाव येथे ‘श्री ईशान्येश्वर मंदिर’ संस्थानच्या आडून आपले काळे साम्राज्य चालवत होता. एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, सध्या हा तपास अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नेमके काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करत, अशा नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, मी कायद्यावर विश्वास ठेवणारा एक सुजाण नागरिक आहे, पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी अशोक खरातचे अघोरी कारनामे पाहतो आणि ऐकतो, तेव्हा माझ्यासारख्या माणसाच्याही मनात येते की याला कायद्याची कोणतीही सवलत मिळू नये. ‘नो कोर्ट, नो कचेरी’; याला फक्त भर चौकात सुया टोचून फासावर लटकवले पाहिजे. मुनगंटीवारांनी व्यक्त केली खंत २१ व्या शतकात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांचे शिक्षण शाळांमधून देतो. मात्र, अशा प्रकारचे भोंदू बाबा समाजाला तर त्रास देतातच, पण हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचे काम करत आहेत, अशी खंत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. इतर भोंदू बाबांना इशारा गेला पाहिजे मुनगंटीवार म्हणाले, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, जिथे स्त्रीला देवाच्या बाजूचे स्थान दिले जाते. मात्र, या भोंदू बाबाने स्त्रियांचा अवमान करून प्रत्यक्ष देवाचा आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी देशातील सर्व भोंदू बाबांना निरोप गेला पाहिजे की—’याद रखो तुम्हारी मौत पक्की है! नेमके प्रकरण काय? स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्याचा बनाव करून नाशिक आणि सिन्नर परिसरात वावरत होता. त्याने सिन्नरच्या मिरगाव येथे ‘श्री ईशान्येश्वर मंदिर’ नावाने एक मोठे संस्थान उभारले होते. अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ असल्याचे भासवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. एका ३५ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. एसआयटी तपासात धक्कादायक खुलासे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा मुळापासून तपास करत आहे. आतापर्यंतच्या तपासात खरातच्या संदर्भात अत्यंत संतापजनक माहिती समोर आली आहे. पोलिसांना खरातच्या डिजिटल उपकरणांमधून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे पुरावे आहेत. भोंदू खरातकडे २०० कोटींची संपत्ती? अशोक खरातची नाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरात सुमारे २०० कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता असण्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच त्याच्या फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



