
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत जमलेत. पण आता त्यांना सरकारकडून करण्यात येणाऱ्या कथित गळचेपीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार र
.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. पण अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यातच सरकारकडून कथितपणे आंदोलकांसाठी पायाभूत सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे स्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सरकारवर पाणपोया व स्वच्छतागृह बंद केल्याचा आरोप केला आहे.
मुंबई शहरातील पाणपोया बंद
रोहित पवार शनिवारी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय?
सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे यांचा बीएमसीच्या आयुक्तांना इशारा
दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, बीएमसी व सीएसएमटी समोरच्या पोरांना विनंती आहे की, शांततेने घ्या. तुम्हाला जेवायला मिळाले नाही. मुख्यमंत्री तुम्हाला पाणी मिळू देत नाहीत. कारण सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. तुम्ही सेवानिवृत्त झाले तरी आयुक्त साहेब तुम्हाला सुट्टी देणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचे पाणी बंद केले. आजवर चांगल्या चांगल्यांची जिरली आहे, तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना कधी बदल होईल. त्यावेळी सगळा हिशोब होणार आहे. त्यांचे नाव फक्त लिहून ठेवा. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? असे ते आयुक्तांना थेट इशारा देताना म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांचे ऐकून आयुक्तांनी आमच्या पोरांचे पाणी बंद केले. बाथरूम बंद केले. दुकाने बंद केली. पोलिसांनी आमच्या पोरांना डिवचू नये. विनाकारण ताण देऊ नये, असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.
जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग, आंदोलकांना सुविधा पुरवल्या
- सततच्या पावसामुळे, आझाद मैदानावर झालेला चिखल हटवून प्रवेशमार्गावर 2 ट्रक खडी टाकून मार्ग समतल केला.
- आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.
- आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे 11 टँकर्स उपलब्ध केले आहेत. अतिरिक्त टँकर्स मागविले आहेत.
- आंदोलनस्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी समर्पित कर्मचारी तैनात आहेत.
- वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे.
- 4 वैद्यकीय पथक आणि 2 रुग्णवाहिका मैदान परिसरात 24 तास कार्यरत आहेत.
- 108 रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध.
- आझाद मैदान व परिसरातील “पैसे द्या आणि वापरा” या तत्त्वावरील तसेच इतर सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध.
- मैदानात आतील बाजूस एकूण 29 शौचकूप असणारे शौचालय विनामूल्य उपलब्ध.
- आझाद मैदानास लागून असलेल्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी 10 शौचकुपे असलेली 3 फिरती शौचालये उपलब्ध.
- मेट्रो साइट शेजारी 12 फिरती (पोर्टेबल) शौचालये + अतिरिक्त शौचालयांची सोय.
- तसेच, फॅशन स्ट्रीट पदपथ आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर मिळून 250 शौचकूपे असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी पुरवली आहेत.
- पावसाळी परिस्थिती पाहता आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र 2 पथके कार्यरत आहेत.
- इतर आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आंदोलन परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख. नजीकच्या इतर कार्यालयांमधून अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची नेमणूक.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.