
Open Letter To Sarnaik: राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवासाठी टेस्ला कार विकत घेतली. आपण या कारने नातवाला शाळेत सोडणार आहोत, त्यामुळे इतरांनाही इलेट्रीक कार वापरण्याची प्रेरणा मिळेल. मात्र सरनाईक यांनी भारतातील पहिल्या टेस्लाचे मालक होण्याचा मान मिळवल्यानंतर जवळपास 65 लाखांच्या या कार खरेदीवरुन त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अभिनेता अस्ताद काळेने सोशल मीडियावर सरनाईक यांच्यावर रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत या टेस्ला खरेदीवरुन टीका केली. या टीकेनंतर आता छात्र भारतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यावतीने परिवहन मंत्र्यांना खुले पत्र लिहिले आहे.
आजोबा आम्हाला टेस्ला कार नको, शाळेत जायला…
‘आजोबा आम्हाला टेस्ला कार नको, फक्त शाळेत जायला एसटी पास मोफत करा’, या मथळ्याखाली हे पत्र लिहिण्यात आलं आहे. “महाराष्ट्रातील ग्रामीण व शेतकरी कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शाळा–महाविद्यालयात पोहोचण्यासाठी एस.टी. बस हा एकमेव आधार आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांच्या एस.टी. पासबाबत होणारी दिरंगाई, अपमानास्पद वागणूक आणि पास संपल्यामुळे विद्यार्थ्यांना बसमधून उतरविण्याच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
भरपावसात त्या विद्यार्थ्याला एस.टी.तून उतरवलं
चोपडा तालुक्यातील उनपदेव–अडावद मार्गावर 19 ऑगस्ट 2025 रोजी पाचवीतील आदिवासी विद्यार्थी बादल राजाराम बारेला याला पास संपल्याने भर पावसात एस.टी.मधून खाली उतरवण्यात आले. दोन ते तीन किलोमीटर पायी चालत तो मुलगा घरी पोहोचला. 20 दिवस झालेत आजपर्यंत संबंधित वाहकावर कुठलीही कारवाई झालेली नाही, अशी आठवण सरनाईकांना करुन देण्यात आली आहे.
पत्र जसच्या तसं
आम्हालाही आजोबांचे प्रेम समजते. मात्र, आपल्या नातवाप्रमाणेच ग्रामीण, आदिवासी व शेतकरी कुटुंबातील लाखो विद्यार्थ्यांचीही दररोज शाळेत पोहोचण्याची जबाबदारी परिवहन मंत्र्यांची आहे, असं पत्रात म्हटलं आहे. या पत्रातील मजकूर जसाच्या तसा खालीलप्रमाणे –
वर्तमानपत्रातून आपण आपल्या नातवाला शाळेत जाण्यासाठी भारतातील पहिली टेस्ला कार गिफ्ट दिली अशी माहिती समजली. आजोबाचे नातवाबद्दल प्रेम पाहून आम्हालाही आनंद झाला.
20 दिवस झालेत आपण ज्या खात्याचे मंत्री आहात त्या परिवहन विभागाच्या एस.टी.मधून 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी चोपडा तालुक्यातील उनपदेव-अडावद या गावादरम्यान बादल राजाराम बारेला या पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्याला पास संपल्यामुळे भर पावसात अपमानित करुन रस्त्यात खाली उतरवले. पावसात भिजत हा विद्यार्थी दोन ते तीन किमी पायी चालून उनपदेवनजीक पाड्यावर आपल्या घरी परतला. पण अद्यापही त्या प्रकरणात आपण एसटी वाहकावर कुठलीही कारवाई केली नाही.
बसचा पास नाही म्हणून महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या हे नवीन नाही. असे अपमानित झाल्यामुळेच मुले अशी टोकाची पावले उचलतात. त्यामुळे गावखेड्यातील विद्यार्थांसोबत एस.टी. प्रवासादरम्यान योग्य व सहानुभूतिपूर्वक वर्तवणूक करावी असे सक्त आदेश परिवहन मंडळाला द्यावे.
परिवहन मंत्र्याचा नातू जर टेस्ला कारने शाळेत जात असेल तर आमच्या शेतकरी, कष्टकरी, वर्गातील विद्यार्थ्यांनी एसटीतून सन्मानाने प्रवास करावा यासाठी आपण एस.टी. पास मोफत करणार का? आपल्या नातवाचा हट्ट पूर्ण केलात त्याच्याच वयाच्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचा हट्ट पूर्ण करणार का?
कृपया महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना एस. टी. पास मोफत देण्यात यावा, ही विनंती.
या पत्राखाली छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले, कार्याध्यक्ष अनिकेत घुले, संघटक सचिन काकड आणि युवती संघटक दीप्ती शेलार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.