
परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होता. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या 10 महिन्यांपासून एक माणूस इथे नाही. जगमित्र कार्यालय तरीही सुरु आहे. नाव न घेता धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण नाव न घेता उल्लेख केला.
Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण;काय म्हणाले पहा#dhananjaymunde #walmikkarad #Zee24Taas #MarathiNewsTodayLive pic.twitter.com/RFmUxpsnxm
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 24, 2025
धनंजय मुंडे काय म्हणाले?
मला माझ्या सहकाऱ्याची आज आठवण येतेय. परळीतले जगमित्र कार्यालय 12 महिने 24 तास सुरू होते आणि आहे. पण तिथे एक व्यक्ती नाही. त्या कार्यालयातून अडल्या नडलेल्यांना गोरगरिबांना आपण मदत करायचो. पण या सगळ्यात एक सहकारी आपल्यात नाही आहे, याची मला जाणीव आहे. कुणाचे काय चुकले, काय नाही हे न्यायदेवता तपासून पाहील, असे धनंजय मुंडे म्हणाले. परळीच्या प्रचारसभेत वाल्मिक कराड याची आठवण काढून शहरात हजारोंच्या संख्येने असलेल्या वाल्मिक अण्णा समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याची चर्चा आहे.
काय आहे प्रकरण?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला..या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड काही महिन्यांपासून जेलमध्ये आहे. वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणात आल्यानंतर त्याचे निकटवर्तीय असलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचंही नाव जोडलं गेलं होतं आणि यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
राजकारणाच्या मुख्यप्रवाहातून काहीसे बाजुला फेकल्यासारखी धनंजय मुंडेंची अवस्था झाली मात्र एवढं सगळं होऊनही मुंडे अद्यापही धनंजय मुंडे यांना आरोपी वाल्मिक कराडची आठवण येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. 10 महिन्यापासून आपला एक व्यक्ती आपल्यासोबत नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी वाल्मिकची आठवण काढली आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी वाल्मिकची आठवण काढली आहे.
धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या काढलेल्या आठवणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केलीय. तर अजित पवारांचे आतातरी डोळे उघडावेत आणि धनंजय मुंडेंना पाठिशी घालणं बंद करावं असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
राक्षसी प्रवृत्तीच्या वाल्मिक कराडने संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या केली..अशा व्यक्तीबद्दल कोणतीही भावना असणाऱ्या माणसाला माणूस म्हणता येणार नसल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. अशा नेत्यांना निवडून न देण्याचा आवाहनही दमानिया यांनी परळीच्या जनतेला केलं आहे.
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हिडिओ जेव्हा समोर आले होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. एवढ्या क्रूरपणे देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या सगळ्याचा मुख्यसुत्रधार वाल्मिक कराड जेलची हवा खातोय. यामुळे टीकेचे धनी ठरलेले आणि मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे अद्याप वाल्मिकच्या प्रेमातून बाहेर पडल्याचं दिसत नाही.. त्यामुळे धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठलीय. वाल्मिकची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडेंना धनंजट मुंड़ेंच्या लेकरांचा तो केविलवाणा चेहरा आठवला नसेल का हा प्रश्न निर्माण होतो आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



