
अहमदाबादमध्ये आज घडलेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अहमदाबादहून लंडनकडे झेपावलेले एअर इंडियाचे विमान काही मिनिटांतच कोसळले. या दुर्घटनाग्रस्त विमानात एकूण २४२ प्रवासी होते. या अपघातात पंढरपूरच्या एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू
.
सांगोला तालुक्यातील हातीद गावचे मूळ रहिवासी असलेले महादेव तुकाराम पवार (६७) आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार (५५) हे दाम्पत्य लंडनला आपल्या मुलाला भेटण्यासाठी प्रवास करत होते. सध्या हे दोघे अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये तर दुसरा लंडनमध्ये बेकरी व्यवसायात आहे. आपल्या लंडनस्थित मुलाला भेटण्यासाठी ते लंडनला निघाले होते, पण काळाने विमान अपघाताच्या रूपाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या निधनामुळे हातीद गावात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे या अपघाताच्या अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच हे दोघे गावात भावांना भेटण्यासाठी आले होते.
दरम्यान, या विमानात बदलापूरचा रहिवासी दीपक पाठक यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. दीपक पाठक गेल्या ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळीच लंडनला रवाना होण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता. मात्र, दुपारी अपघात घडल्यानंतरपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. दीपक पाठक यांचे कुटुंब बदलापूरच्या कात्रप परिसरातील रावल कॉम्प्लेक्समध्ये राहते. अपघाताची बातमी समजताच शेजारी आणि नातेवाईकांनी त्यांच्या घरी धाव घेतली आहे. दरम्यान, “आमचा देवावर पूर्ण विश्वास आहे, जोवर अधिकृत माहिती समोर येत नाही तोवर आम्ही आशा सोडणार नाही,” असे दीपक यांच्या बहिणीने सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.