
Maharashtra ZP Election 2026 : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आज मतदानावेळी घडलेल्या घटनेने चर्चाना उधाण आले आहे. शिवसेनेचे आमदार विलास भुमरे हे पाचोडमध्ये मतदानाला गेले असताना त्यांचा लहान मुलगाही त्यांच्या सोबत होता. मतदानानंतर आमदार भुमरेंच्या बोटाला शाई लावताना त्यांच्या मुलाच्याही बोटाला मतदान अधिकाऱ्याने गंमत म्हणून शाई लावली. या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दरम्यान झालेल्या निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी पैठण तालुक्यातील पाचोड बु. येथील मतदान केंद्रावरील तीन कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे. सदर मतदान केंद्र क्रमांक 58-पाचोड बु.115-पाचोड बु.58/7, जि.प.कें.प्रा.शाळा पाचोड बु. (पश्चिम बाजू), खोली क्रमांक 4 येथील 1) केंद्रप्रमुख श्री दिलीप देवराव नरवडे, सहायक शिक्षक, संत एकनाथ हायस्कूल, चित्तेगाव ता. पैठण 2) मतदान अधिकारी क्रमांक 3 सौ. संगीता नामदेव केदार, सहायक शिक्षक, जि.प. प्रा. शाळा, कल्याण नगर, पाचोड ता. पैठण आणि 3) सौ. रेणुका सुरेश बोंबले, होमगार्ड (बक्कल क्र. 2713), पैठण पथक, पोलीस ठाणे पाचोड यांचेकडून निवडणुकीसारख्या अतिसंवेदनशील कामकाजात बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मतदानाच्या दिवशी लहान मुलासोबत मतदान कक्षात प्रवेश होऊन मतदान प्रक्रियेची गोपनीयता धोक्यात येईल अशी स्थिती निर्माण होऊ दिल्याने, तसेच आवश्यक ती दक्षता न घेता दिलेल्या प्रशिक्षणानुसार नियमांचे पालन न केल्याने संबंधित तिन्ही कर्मचाऱ्यांचे स्पष्टीकरण अमान्य ठरवून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 134 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार त्यांना मतदान समाप्त झाल्याच्या क्षणापासून शासकीय सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण यांना देण्यात आले असून, निलंबन काळातील निर्वाह भत्त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित प्राधिकरणांना देण्यात आले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



